

कडेगाव शहर : भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम हे दृष्टिसाक्षेपी द्रष्टे विचारवंत होते. पदवीच्या जोडीला आवश्यक सामाजिक शहाणपण त्यांच्याकडे असल्याने सहकारातून शेती, शिक्षण, आर्थिक, वैचारिक आणि सांस्कृतिक विकास साधत त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी काढले.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या 30 व्या स्थापना दिन कार्यक्रमात भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्यावतीने देण्यात येणारा जीवनसाधना गौरव पुरस्कार डॉ. तारा भवाळकर यांना प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह, प्र-कुलगुरू आमदार डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, कुलसचिव जी. जयकुमार, भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. एम. एस. सगरे, डॉ. के. डी. जाधव यावेळी उपस्थित होते.
तत्त्वांशी तडजोड न करता डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना करून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने संस्थेचा विस्तार करण्यासाठी आयुष्य वेचले असल्याची भावना हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
मंगल प्रभात लोढा यांनी, विद्यापीठात कौशल्य विकासाचे शिक्षण सुरू करण्यासाठी तीन महिन्यात संमती देऊ, अशी ग्वाही दिली.
डॉ. शिवाजीराव कदम यांनी, शिक्षणाचा उपयोग व्यवहारात करता यावा, यासाठी कौशल्य विकासावर भर देण्याचा प्रयत्न विद्यापीठाद्वारे केला जात असल्याची माहिती दिली. डॉ. विश्वजित कदम यांनी, विद्यापीठाला सलग चौथ्यांदा नॅक ए++ मानांकन मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. डॉ. विवेक सावजी यांनी विद्यापीठाच्या देदीप्यमान प्रवासाची माहिती विशद केली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र उत्तूरकर, प्रा. डॉ. ज्योती मंडलिक यांनी केले.