महेश कुलकर्णी
शिराळा शहर : शिराळा तालुक्यातील पश्चिमेकडील दुर्गम भागातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे आहेत. कोकरूड येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. यामुळे कोकरूड आणि चरण मंडलातील 63 गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली आहे, प्रस्तावही दिला आहे, अशी माहिती आमदार सत्यजित देशमुख यांनी दिली.
ते म्हणाले, शिराळा तालुका भौगोलिकदृष्ट्या लांब आणि डोंगरी आहे. दुर्गम भागातील नागरिकांना साध्या कामासाठीही 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास करून शिराळा शहरात यावे लागते. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होतो. ही अडचण ओळखून 25 मे रोजी शासनाकडे पत्रव्यवहार करून या कार्यालयाची मागणी केली होती. कोकरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची शासकीय जागा या कार्यालयासाठी उपलब्ध आहे. यामध्ये 2 महसूल मंडले, 16 सजे आणि एकूण 63 गावे, वाड्या-वस्त्यांचा समावेश असेल. चांदोली धरणाच्या पाण्याखाली गेलेल्या 18 गावांचाही यामध्ये समावेश आहे.
चरण आणि कोकरूड परिसरातील जनतेला छोट्या-मोठ्या कामांसाठी शिराळा येथे यावे लागते. ज्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे ही गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही कोकरूड येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनस्तरावर सकारात्मक हालचाली सुरू असून लवकरच हे कार्यालय कार्यान्वित होईल. याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अनुमती दर्शवली असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.सत्यजित देशमुख, आमदार, शिराळा विधानसभा.