

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे. सांगली आणि मिरजेतील दोन टोळ्यांतील 16 गुन्हेगारांवर मोक्काचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच 1 हजार 500 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 365 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.
घुगे म्हणाले, महापालिकेच्या निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत दोनपेक्षा अधिक गुन्हे आणि निवडणूक काळात गुन्हे दाखल असलेल्या दीड हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. संघटित गुन्हेगारीसंदर्भात जिल्ह्यातील सोळा संशयितांवर मोक्काचा प्रस्ताव तयार केला आहे. तो कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला आहे.
ते म्हणाले, जिल्ह्यातील काही भागात कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच नाकाबंदीचे नियोजन केले आहे. स्ट्राँग रूमच्या बंदोबस्तासाठी एसआरपीची तुकडी तैनात केली जाणार आहे. परजिल्ह्यातून 700 होमगार्ड सांगलीत येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील 14 पोलिस निरीक्षक, 70 सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक तसेच 1 हजार 110 पोलिस अंमलदारांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. आर्म ॲक्टच्या गुन्ह्यात मागील काही महिन्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे 365 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मृत व्यक्ती आणि शारीरिक क्षमता दुर्बल झालेल्यांचा समावेश असल्याचे घुगे यांनी सांगितले.