फिरदोस जाकीर शिकलगार Pudhari
सांगली

Sangli Girl Drown | येरळा नदीत पोहताना तरुणीचा बुडून मृत्यू; ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे 7 जण बचावले

भाळवणी (ता. खानापूर) येथील येरळा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणीचा बुडून दुर्दैवी मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Khanapur Taluka Yerla River Drowning

विटा : भाळवणी (ता. खानापूर) येथील येरळा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेत इतर सात जणांना ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे वाचवण्यात यश आले आहे.

ही घटना भाळवणी येथील शिकलगार मळा परिसरात घडली. फिरदोस जाकीर शिकलगार (वय २०, मूळ रा. कोरेगाव, सध्या मुंबई) असे मृत तरुणीचे नाव आहे. भाळवणी येथील शिवतेज मंगल कार्यालयात शनिवारी एका लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी मुंबईसह विविध ठिकाणांहून पाहुणे मोठ्या संख्येने आले होते.

समारंभादरम्यान सुमारे १७ ते १८ मुले-मुली व तरुण-तरुणी येरळा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. त्यावेळी काही जणांसोबत पालकही नदीकाठावर उपस्थित होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने काही मुले अचानक खोल पाण्यात गेली आणि गोंधळ निर्माण झाला.

या समूहात फिरदोस शिकलगार हिचाही समावेश होता. तीही खोल प्रवाहात अडकली आणि बुडू लागली. ही बाब लक्षात येताच नदीकाठावरील ग्रामस्थ आणि पालकांनी तात्काळ आरडाओरडा करत पाण्यात उड्या घेतल्या. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सात ते आठ मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

मात्र, फिरदोस ही पाण्याच्या प्रवाहात खोलवर ओढली गेल्याने तिला बाहेर काढताना मोठा उशीर झाला. तिला बाहेर काढून तातडीने विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिला मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, लग्नसमारंभात आनंदाचे वातावरण असतानाच झालेल्या या दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT