कडेगाव येथे मोहरम निमित्त गगनचुंबी ताबूतांच्या पारंपरिक गळाभेटीचा थरारक क्षण. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले  Pudhari
सांगली

Kadegaon Muharram | कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या गळाभेटींचा भव्य सोहळा उत्साहात: हजारो भाविकांची उपस्थिती

मोहरममधून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रेरणादायी संदेश

पुढारी वृत्तसेवा

Sangli Kadegaon Taboot

कडेगाव शहर : "महान भारत देश अमुचा, घुमवू जयजयकार..." आणि "हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे..." अशा राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणांनी कडेगाव नगरी शुक्रवारी दुमदुमून गेली. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि धार्मिक ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा जपणाऱ्या कडेगावच्या मोहरममधील गगनचुंबी ताबूतांच्या गळाभेटींचा दिमाखदार सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने उत्साहात संपन्न झाला.

या अद्वितीय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, मुंबई तसेच कर्नाटक राज्यातून हजारो भाविक कडेगावात दाखल झाले होते. कडक उन्हात देखील मोठ्या उत्साहाने सोहळ्याची रंगत अधिकच खुलली.

शुक्रवारी सकाळी कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, सोहोली, निमसोड आदी गावांतील मानकरी वाजत-गाजत कडेगावात दाखल झाले. विधिवत पूजनानंतर सकाळी 11 वाजता मानाचा सातभाई ताबूत उचलण्यात आला आणि गळाभेटींच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. विजबोर्ड परिसरात देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत एकत्र आले. त्यानंतर बागवान, अत्तार, शेटे यांच्यासह इतर उंच ताबूत मानाप्रमाणे उचलून पाटील चौकात आणण्यात आले.

यानंतर पाटील यांचा भव्य आणि आकर्षक ताबूत उचलल्यानंतर गगनचुंबी ताबूतांच्या गळाभेटींचा मुख्य सोहळा सुरू झाला. "या हुसेन... हक हुसेन... इमाम हुसेन जिंदाबाद... मौला अली जिंदाबाद..." अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सातभाई, पाटील, बागवान, अत्तार, हकीम आणि देशपांडे यांच्या उंच ताबूतांच्या पारंपरिक भेटी दुपारी 12 वाजता पार पडल्या.

या गळाभेटींना स्थानिक नागरिक "राम-भरताची भेट" असे संबोधतात. या भावपूर्ण क्षणी उपस्थितांनी फेटे आणि टोप्या आकाशात उंचावत जल्लोष केला. कडक ऊन आणि जोरदार वाऱ्याच्या झोतांमध्ये डोलणारे गगनचुंबी ताबूत पाहून भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.

त्यानंतर सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत-गाजत सुरेशबाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) येथे दाखल झाले. मार्गात तांबोळी व इतर ताबूतही सहभागी झाले. माईनकर, इनामदार आणि सुतार यांचे उंच व आकर्षक ताबूत उचलल्यानंतर सर्व ताबूत मुख्य भेटीच्या ठिकाणी एकत्र आणण्यात आले.

मोहरम मैदानावर मेलवाल्यांनी "महान भारत देश अमुचा घुमवू जयजयकार" तसेच "प्यारा प्यारा हमारा देश प्यारा... अब एकीका कर दो पुकारा....हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे..." ही राष्ट्रीय एकात्मतेची गीते सादर करून बंधुभावाचा संदेश दिला. त्यानंतर हिंदू मानकऱ्यांच्या हस्ते मसूद माता ताबूत पंजे आणि बारा इमाम पंजे आणण्यात आल्यानंतर पारंपरिक मानाप्रमाणे मुख्य गळाभेटींचा सोहळा संपन्न झाला. दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व ताबूत आपल्या स्थानावर परतले.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार मोहनराव कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार अरुण लाड,भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड,पंचायत समितीचे सभापती डॉ जितेश कदम,हर्षवर्धन कदम,नगराध्यक्ष धनंजय देशमुख,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मालन मोहिते, प्रांताधिकारी रणजित भोसले,तहसीलदार अजित शेलार,मुख्याधिकारी पवन म्हेत्रे, राजेंद्र देशपांडे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांच्यासह विरोधीपक्ष नेते , उपनगराध्यक्ष,सर्व नगरसेवक, सर्व ताबूत मालक, मानकरी आणि हजारो भाविक उपस्थित होते. सोहळ्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पहाटेपासूनच कडेगावात भाविकांची गर्दी

सकाळी सात वाजल्यापासून सांगली, सातारा, कराड, विटा, कोल्हापूर, पुणे, मुंबई तसेच कर्नाटकातून भाविक विविध वाहनांनी कडेगावात दाखल होत होते. गावातील मुख्य रस्ते, चौक आणि गल्लीबोळ भाविकांनी फुलून गेले होते. महिला, युवक आणि आबालवृद्धांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. मान्यवरांसाठी विशेष व्यासपीठ उभारण्यात आले असून नगरपंचायतीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

मसूद माता ताबूत पंजे आणि बारा इमाम पंजे ठरले आकर्षण :

मुख्य गळाभेटी सोहळ्यादरम्यान मसूद माता ताबूत पंजे आणि बारा इमाम पंजे यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. उंच ताबूतांसह या पारंपरिक धार्मिक प्रतीकांनी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

राष्ट्रीय एकात्मतेचे जिवंत प्रतीक :

दीडशे वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेला कडेगावचा मोहरम हा केवळ धार्मिक उत्सव नसून, हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे जिवंत प्रतीक म्हणून आजही संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख जपून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT