Sangali Islampur Renamed Ishwarpur latest update
ईश्वरपूर: गेली चाळीस ते पन्नास वर्षांची सातत्याने होत असलेली मागणी अखेर पूर्ण झाली असून, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे 'ईश्वरपूर' असे नामांतरण करण्याच्या प्रस्तावास केंद्र सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे.
केंद्र शासनाच्या अध्यादेशामुळे यापुढे सर्व शासकीय कार्यालये, दस्तऐवज आणि रेल्वे, पोस्ट खात्याच्या नोंदींमध्येही शहराचा उल्लेख 'ईश्वरपूर' असाच होणार आहे. या निर्णयामुळे हिंदुत्ववादी संघटनांसह शहरवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
नामांतराचा शासकीय प्रवास पूर्ण
राज्य सरकारने शुक्रवार १८ जुलै रोजी इस्लामपूर शहराचे 'ईश्वरपूर' असे नामांतरण करण्याच्या नगरपालिकेच्या प्रस्तावास विधिमंडळात मंजुरी दिली होती आणि तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवला होता. आता, दिनांक १४ ऑक्टोबर रोजी केंद्र शासनाच्या भारतीय सर्वेक्षण विभागाने 'ईश्वरपूर' या नामांतरणास मंजुरी देत तसा शासकीय अध्यादेश काढला आहे. याबरोबरच, भारतीय डाक विभाग आणि भारतीय रेल्वे खात्यालाही त्यांच्या दप्तरी शहराचे नाव बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे नामांतराची प्रक्रिया अधिकृतपणे पूर्ण झाली आहे.
नामकरणाच्या मागणीचा प्रदीर्घ इतिहास:
'ईश्वरपूर' नामकरणाच्या मागणीला प्रदीर्घ इतिहास आहे.
१९२७: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी इस्लामपूरला भेट दिली असता त्यांनी शहराचा उल्लेख 'ईश्वरपूर' असा केला होता. त्यानंतर संघाचे तत्कालीन प्रमुख श्री. पंत सबनीस यांनीही ही मागणी पुढे रेटली होती.
१९८६: शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेत 'इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण व्हावे' अशी घोषणा केली. तेव्हापासून हा प्रश्न अधिक गंभीरपणे चर्चेत आला.
शिवसेना, शिव प्रतिष्ठान आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने आणि पाठपुरावा केला.
२०२१: तत्कालीन नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील नगरपालिकेच्या सभेत नामांतराचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
राजकीय पाठपुरावा: तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत लवकरच नामकरण करण्याची घोषणा केली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी सुमारे २५ ते ३० हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन शासनाला सादर केले होते. आमदार सदाभाऊ खोत यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला, ज्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला.
२०१४: शहरात नामकरण समिती स्थापन करून शिवप्रतिष्ठानचे बाळासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांच्यासह अनेकांनी हा पाठपुरावा चालू ठेवला.
नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
केंद्र सरकारने शहराच्या नामांतरणास मंजुरी दिल्यामुळे अनेक वर्षांचा लढा यशस्वी झाल्याची भावना शहरवासीयांमध्ये आहे. हा निर्णय म्हणजे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीची पुनर्स्थापना असल्याचे मानले जात असून, शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यापुढे शासकीय कामकाजात आणि स्थानिक जीवनातही 'इस्लामपूर' ऐवजी 'ईश्वरपूर' हे नाव रूढ होणार आहे.