

इस्लामपूर : इस्लामपूर शहराचे नाव हे उरुण ईश्वरपूर असेच होणार आहे. राज्य सरकार लवकरच तसा शासकीय अध्यादेश काढणार आहे. त्यामुळे यात राजकारण आणून कोणी जातीय तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करू नये, तसेच या मागणीसाठी शुक्रवारपासून जे लोक उपोषणास बसणार आहेत, त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत केले.
निशिकांत पाटील म्हणाले, इस्लामपूर शहर हे धार्मिक सलोखा जपणारे शहर आहे. येथे हिंदू - मुस्लिम धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने राहत आहेत. आजपर्यंत येथे कधीही दोन्ही धर्मात जातीय तेढ निर्माण झालेली नाही. मात्र नामांतराचा मुद्दा पुढे करत काही लोक दोन्ही धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझी त्यांना विनंती आहे, त्यांनी कृपा करून यामध्ये राजकारण आणून सामाजिक एकोपा भंग पावेल असे व्यक्तव्य करू नये.
ते म्हणाले, 1875 साली अस्तित्वात आलेल्या नगरपालिकेचे इस्लामपूर नगरपालिका असेच शासनदप्तरी नाव आहे, तर पोस्ट खाते, शासकीय बँका येथे उरुण इस्लामपूर असा उल्लेख आहे. शहरात इस्लामपूर व उरुण असे दोन वेगवेगळे सजे आहेत. राज्य सरकारने फक्त इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामकरण केले आहे. उरुण नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही. केंद्र शासनाची ईश्वरपूर नावास मान्यता मिळाल्यानंतर राज्य सरकार नामांतराचा शासकीय अध्यादेश काढणार आहे. तो उरुण ईश्वरपूर असाच निघणार आहे. राज्य सरकारला तसा अधिकारही आहे. आमदार सदाभाऊ खोत, अण्णासाहेब डांगे, मी तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी सरकारकडे तशी मागणीही केली आहे. यावेळी धैर्यशील मोरे, संदीप सावंत, दादासाहेब रसाळ, चंद्रकांत पाटील, यदुराज थोरात उपस्थित होते.
निशिकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही उरुण ईश्वरपूर अशा नामांतराचा अध्यादेश काढण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच तसा शासकीय अध्यादेश निघेल. त्यामुळे शुक्रवारपासून जे लोक उपोषणास बसणार आहेत, त्यांनी उपोषण मागे घ्यावे.