ईश्वरपूर ते इस्लामपूर... इस्लामपूर ते पुन्हा ईश्वरपूर

आदिलशाहीचा प्रभाव आणि इस्लामपूर नामांतर
Sangli News
इस्लामपूर ते ईश्वरपूर
Published on
Updated on

राज्य सरकारने 18 जुलै 2025 रोजी इस्लामपूरच्या नामकरणाला मंजुरी दिल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली. आता इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर असे करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला आहे. हा निर्णय अनेक वर्षांच्या मागणीचा परिणाम आहे. शहराच्या इतिहासाला पुन्हा एकदा त्याच्या मूळ ओळखीशी जोडण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल. इस्लामपूरचा इतिहास हा केवळ एका शहराचा इतिहास नाही, तर तो महाराष्ट्राच्या आणि भारताच्या बदलत्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थितीचा आरसा आहे. ईश्वरपूर ते इस्लामपूर आणि पुन्हा ईश्वरपूर असा हा प्रवास. अनेक राजवटींचा, संस्कृतींचा आणि लोकभावनांच्या प्रतीकांचाही हा प्रवास. दुसरे असे की, या निर्णयाच्या निमित्ताने उरुण परिसरातील नागरिकांनी उरुण-ईश्वरपूर असे नामकरण करण्याची मागणी केली आहे, कारण उरुण हे स्वतंत्र महसुली, ऐतिहासिक गाव. या गावाला स्वतःचा एक वेगळा आणि महत्त्वाचा इतिहास आहे. यानिमित्ताने ऐतिहासिक पैलूंवर, लोकभावनांचा एक धांडोळा...

उत्तर मध्य युगात, विशेषतः आदिलशाही राजवटीच्या काळात (सुमारे 1490 ते 1686 पर्यंत) या नगराची स्थापना झाली आणि या काळातच या शहराला इस्लामपूर हे नाव मिळाले, असे इतिहासकार मानतात. त्यापूर्वी हे गाव ईश्वरपूर म्हणून ओळखले जात होते.आदिलशाही ही दख्खनमधील एक प्रमुख मुस्लिम सल्तनत होती, ज्याची राजधानी विजापूर होती. त्यांनी राज्याच्या विस्तारामध्ये या प्रदेशालाही समाविष्ट केले. आदिलशाहीच्या काळात अनेक ठिकाणी इस्लामिक संस्कृतीचा प्रभाव वाढला, ज्यातून अनेक गावांची आणि शहरांची नावे बदलली गेली. अशाच पध्दतीने इस्लामपूर करण्यामागे आदिलशाहीचा प्रभाव एक महत्त्वाचे कारण मानले जाते. या काळात शहरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या वाढली आणि शहराच्या चारही बाजूंनी पीर (सूफी संत किंवा आदरणीय व्यक्तींचा दर्गा) स्थापन झाले, ज्यामुळे हे नाव अधिक प्रचलित झाले.

मराठा साम्राज्य आणि त्यानंतरची वाटचाल...

आदिलशाहीच्या पतनानंतर, हे राज्य मराठा साम्राज्याच्या ताब्यात आले. शिवाजी महाराजांनी हयातीत अनेक किल्ले आणि प्रदेश काबीज केले, ज्यात सातारा जिल्ह्यातील काही भागाचाही समावेश होता. इस्लामपूर थेट शिवाजी महाराजांच्या ताब्यात कधी आले, याचा ठोस उल्लेख नसला तरी, सतराव्या शतकामध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून नारुराम मंत्री यांना इस्लामपूर, उरुण, बागणी आदी गावांचे इनाम मिळाले. या गावांमध्ये मराठा साम्राज्याच्या विस्तारामुळे या परिसरावरही त्यांचा प्रभाव वाढला. मराठा साम्राज्यात धार्मिक सहिष्णुतेला महत्त्व दिले जात असल्याने, नामांतराचा प्रश्न फारसा ऐरणीवर आला नाही.

ब्रिटिश राजवटीत, 1875 मध्ये इस्लामपूर म्युनिसिपालटीची (नगरपरिषद) स्थापना झाली. या काळात शहराचा विकास नियोजित पद्धतीने सुरू झाला. रस्ते, पाणी पुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांची उभारणी झाली. उरुण आणि इस्लामपूर ही दोन्ही गावे कालांतराने जोडली गेली आणि उरुण-इस्लामपूर असे संयुक्त नाव रूढ झाले. उरुणावती देवीच्या मंदिरामुळे दोन्ही गावांच्या एकीकरणाला बळकटी मिळाली.

स्वतंत्र भारतात नामांतराची मागणी...

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, अनेक जुन्या ऐतिहासिक शहरांची आणि स्थळांची नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. इस्लामपूरचे नाव बदलून पुन्हा ईश्वरपूर करण्याची मागणी 1970 च्या दशकात प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली. त्यानंतर, शिवप्रतिष्ठान, भाजप आणि शिवसेना यांसारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी या मागणीला अधिक जोर लावला. 1986 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची येथील यल्लमा चौकात जाहीर सभा झाली होती. या सभेत ईश्वरपूरचा उल्लेख झालेला होता. नंतर शिवसैनिकांकडूनही ही मागणी होत गेली. त्यानंतर उरुण-ईश्वरपूर नामकरण समिती स्थापन होऊन लेखी निवेदने दिली, तसेच आंदोलने झाली. परकीय आक्रमकांच्या नावाने असलेल्या शहरातील खुणा मिटल्या पाहिजेत व जुन्या भारतीय नावांचे पुनरुत्थान झाले पाहिजे, या मागणीला काही पक्षांनी विरोध केला. कारण त्यांना हे अल्पसंख्याकांवर दबाव आणण्याचे कृत्य वाटत होते. परंतु, नामांतराची मागणी करणार्‍या संघटनांनी सातत्याने आंदोलने आणि निवेदने दिली. आ. सदाभाऊ खोत, आ. सत्यजित देशमुख यांनीही विधानसभेत या नामांतराची मागणी केली होती.

सध्याची लोकभावना...

पाटील भजनी मंडपाजवळ असणार्‍या उरुणावती चौकामधील जुन्या वाड्यात तळघरात एक भुयार होते. त्या भुयारामध्ये उरुणावतीदेवी होती. कालांतराने त्या ठिकाणची पडझड झाल्याने तेथील भुयार आणि तळघर मुजले. त्यानंतर देवीची मूर्ती वर घेताना लोकांना त्रास होऊ लागल्याने मूर्तीला कोणीही हात लावला नाही. आता श्रध्देने लोक त्या वाड्यातील एका भिंतीला असणार्‍या छोट्या दिवळीलाच येथील उरुणादेवी मानतात, असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news