सांगली : गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले होते, मात्र सांगली शहरासह जिल्ह्याच्या बहुतेक भागात शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी रात्री उशिरापर्यंत दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने कोयना धरणातून 23 हजार, तर चांदोली धरणातून 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा-वारणा नद्यांची पाणी पातळी वाढण्याची शक्यता गृहित धरून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्रीपासून सातत्याने पाऊस झाल्यामुळे शहरातील रस्त्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. उपनगरांमध्येही चिखल, दलदल यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
यंदा मे महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार झाला. ओढे, नाले यांना पूर आले. त्याशिवाय मान्सूनचे आगमनही यंदा मे महिन्यातच झाले. त्याशिवाय जूनमध्येही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतेक तलावांत चांगला पाणीसाठा झाला. धरणांतील पाणी पातळीत चांगली वाढ झाली. मात्र जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले. अधुन-मधून तुरळक पाऊस पडत होता. प्रत्येकवर्षी जुलैमध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पुराची स्थिती निर्माण होत होती. यंदा मात्र पाऊस कमी झाल्याने अद्याप पूरस्थिती निर्माण झालेली नाही. मात्र शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा दमदार पाऊस सुरू आहे. सांगली शहरात दिवसभर पावसाचे वातावरण होते. अधुन-मधून तुरळक उघडीप होत होती. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र पुन्हा दमदार पाऊस सुरू झाल्याने दिलासा मिळालेला आहे.
दरम्यान, नदीकाठावरील नागरिक मात्र धास्तावले आहेत. त्यातच चांदोली, कोयना, धोम, उरमोडी या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जलसंपदा विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. कोयना धरणातून सोडलेले पाणी रविवारी सायंकाळपर्यंत सांगलीत पोहोचून पाणी पातळी वीस फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे उपनगरांमध्ये नागरिकांची तारांबळ उडाली. विशेषतः विजयनगर परिसरातील कुपवाड ड्रेनेज योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या पावसाचा त्रास नागरिकांना होत आहे. याशिवाय शामरावनगर परिसरातही दैना उडाली आहे. शनिवारचा आठवडा बाजारही पावसामुळे विस्कळीत झाला होता.
चांदोली धरण परिसरात पावसाची संततधार कायम आहे. शनिवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत आठ तासात 19 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर गेल्या 24 तासात 38 मिलिमीटर पाऊस पडला आहे. आजअखेर 1847 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील विसर्ग पुन्हा वाढवण्यात आला आहे. सध्या धरणातून व वीज निर्मिती केंद्रातून 10 हजार 260 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. अनेक ठिकाणी नदीकाठच्या पोटमळीत पाणी शिरले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चांदोली धरणाची क्षमता 34.40 टीएमसी असून सध्या 28.96 टीएमसी म्हणजेच 83 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात सध्या 43 हजार 846 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
शिराळा पश्चिम भागातील चरण, आरळा, मणदूर आणि चांदोली धरण परिसरात गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे आणि चांदोली धरणातून 10 हजार क्युसेक विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीचे पाणी तिसर्यांदा पात्राबाहेर पडले आहे. शुक्रवारी रात्रभर आणि शनिवारी दिवसभर परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पोटमळीतील ऊस, भात पिकात पाणी शिरले आहे. दोन दिवसांपासून हवेत मोठ्या प्रमाणात गारवा पसरला आहे.
मिरजपूर्व भागातील लिंगनूर, खटाव, बेळंकी, सलगरे, चाबुकस्वारवाडी परिसरात शुक्रवारी रात्री संततधार पाऊस पडला. सकाळी आठ वाजेपर्यंत हा पाऊस सुरूच होता. या पावसामुळे खरीप पिकांना फायदा झाला आहे. तसेच ऊस पिकासही हा पाऊस पोषक ठरला आहे. द्राक्षबागांच्या हंगामपूर्व फळछाटण्या झाल्या नसल्याने रोगराईची फारशी चिंता नाही. मात्र इतर फळपिके व फळभाज्यांवर करपा, कूज अशा रोगांनी आक्रमण करायला सुरुवात केली आहे. श्रावण महिना असल्याने ऊन-पावसाचे वातावरण राहिल्यास डाळिंब, पपई, पेरू फळबागांवर रोग येण्याची शक्यता आहे. खरीप पिकामध्ये उडीद, मका व मूग या पिकांना या पावसाचा चांगला फायदा होणार आहे.