कर्नाटक हद्दीत गुटखा उत्पादनाचे कारखाने उभारले आहेत. 
सांगली

सांगली : गुटखा विक्री थांबेना, कर्नाटकातून होतेय तस्करी

चौका-चौकात होतो उपलब्ध; पोलिस, अन्न, औषध प्रशासनासमोर खुले आव्हान

दिनेश चोरगे
शीतल पाटील

सांगली : राज्यात गुटखा, सुगंधी तंबाखूसारख्या आरोग्यास हानीकारक पदार्थांच्या विक्रीस व ते बाळगण्यास बंदी असतानाही सांगली शहरासह जिल्ह्यात गुटख्याची छुप्या पद्धतीने तस्करी होत असल्याचे पोलिसांच्या कारवायांवरून स्पष्ट झाले आहे. यंदा सांगली पोलिसांनी गुटखा तस्करी करणार्‍या 32 जणांना अटक करून तब्बल पावणेतीन कोटी रुपये किमतीचा वेगवेगळ्या प्रकारच्या गुटख्याचा साठा जप्त केला. तरीही चौका-चौकातील पान टपर्‍यांवर गुटख्याची खुलेआम विक्री होतच आहे. गुटख्याची खरेदी-विक्री रोखण्याचे मोठे आव्हान पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनासमोर आहे.

तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात गुटखा, मावा, सुगंधी तंबाखूच्या विक्रीवर निर्बंध घातले आहेत. मात्र सरकारी यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे या पदार्थांची सर्रास खरेदी-विक्री होत आहे. राज्यात गुटखा उत्पादनाला बंदी असल्याने शेजारील राज्यांतून गुटख्याची तस्करी जोमाने सुरू आहे. परराज्यातून खुष्कीच्या मार्गाने गुटखा, सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून दिसून येते. तस्करी करून जिल्ह्यात आलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखूच्या विक्रीची दरवर्षीची उलाढाल कोट्यवधींच्या घरात असल्याचे बोलले जाते.

कर्नाटकातून होतेय तस्करी

राज्यात गुटखा उत्पादनावर बंदी आहे. त्यामुळे अनेक गुटखा उत्पादकांनी जिल्ह्याच्या सीमेलगतच कर्नाटक हद्दीत गुटखा उत्पादनाचे कारखाने उभारले आहेत. तेथूनच गुटख्याची मोठी तस्करी होते. जिल्ह्यासह शहरात गुटख्याची वाहतूक करण्यासाठी गुन्हेगारांची मोठी साखळी कार्यरत आहे. त्यातून गुटखा जिल्ह्यात येतो. ही साखळी मोडून काढण्याची गरज आहे. कर्नाटकासह आंध्र प्रदेशातूनही गुटख्याची तस्करी केली जात असल्याचे समजते.

पुणे, नगरला गुटखा वाहतूक

सांगली जिल्ह्यात छुप्या मार्गाने गुटखा आणला जातो. त्याशिवाय पुणे, अहमदनगर जिल्ह्यातही सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. विशेषतः विजापूर परिसरातून गुटख्याची पोती वाहनांतून जतमार्गे पुणे, नगरकडे नेण्यात येत असल्याचे सिद्ध झाले आहे.

टेम्पो, कंटेनरमधून गुटख्याची तस्करी

कंटेनर, टेम्पो, ट्रक अशा मोठ्या वाहनांतून कर्नाटकातून गुटखा वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले आहे. याशिवाय काही तस्करांकडून आलिशान गाड्यांचाही वापर गुटखा वाहतुकीसाठी केला जातो. जत तालुक्यात नुकताच पकडलेला गुटखा ट्रकमधून नेण्यात येत होता. मोठ्या वाहनांची तपासणी फारशी होत नसल्याचाच गैरफायदा तस्करी करणारे घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT