

शिराळा : शिराळा तालुक्यात वारणा व मोरणा नदीला आलेल्या पुरामुळे वारणा व मोरणा नदीवरील 11 बंधारे गेले 8 दिवस पाण्याखाली असून पाण्यामुळे 15 रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. शिराळा- शाहूवाडी संपर्क अद्यापही बंद आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील 21 गावांंतील 101 घरांची पडझड झाली असून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
वारणावती, चांदोली अभयारण्य येथे पाऊस सुरू असून आज 71 मिलिमीटर पाउस पडला आहे. वारणा धरणातील पाणी वेगाने वाढत असून धरणात 29.13 टीएमसी पाणी साठा झाला आहे. धरण 84.67 टक्के भरले आहे. धरणातील विसर्ग 8092 क्युसेक केला आहे. सागाव येथील लोकांचे स्थलांतर अंगणवाडीत केले आहे. दरडी कोसळण्याच्या भीतीने धामणकर वस्ती, भाष्टेवाडी, कोकणेवाडी आदी गावांतील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आरळा, कोकरुड, सागाव, मांगले येथे बोटी सज्ज ठेवल्या आहेत. पूरबाधीत भागाच्या पाहणीसाठी तहसीलदार शामला खोत पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, डॉ. प्रवीण पाटील, वीज मंडळाचे एल. बी. खटावकर, अभियंता प्रवीण तेली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पी. व्ही. कदम आदीनी भेटी दिल्या आहेत. पावसामुळे 1885 जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेल्याने फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.