

सांगली : पुढारी वृत्तसेवा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा ते सात ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात सुरू करणार आहेत. त्यानुसार आठ ऑगस्टला ते जिल्ह्यात येणार आहेत. त्याच्या तयारीसाठी रविवारी दि. 21 रोजी सकाळी 11 वाजता मराठा सेवा संघाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मनोज जरांगे हे सहभागी झाल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढलेली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीतही शांतता मोर्चा काढण्यात आला होता. जरांगे यांच्या दौर्यावेळी समाजातील लोकांची मोठी गर्दी झाली होती. मुंबई येथे झालेल्या मोर्चावेळीही सांगलीतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते गेले होते.
लोकसभा निवडणुकीत जरांगे यांच्या आंदोलनाचा मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे. आता विधानसभा निवडणूक आली आहे. या निवडणुकीत सर्व 288 जागांवरील उमेदवार पाडा, सत्ताधारी व विरोधक या दोघांनाही धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्याचवेळी त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा 7 ऑगस्टपासून सुरू होत आहे. सात ऑगस्टला सोलापूरनंतर ते आठ ऑगस्टला सांगली जिल्ह्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्याचे नियोजन करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात दि. 21 रोजी सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे.