भिलवडी : पलूस तालुक्यातील वसगडे येथे गेल्या पाच वर्षांपासून रेल्वे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या अद्यापही अनुत्तरीत आहेत. मोबदला आणि पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी सोमवार, दि. 10 नोव्हेंबररोजी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग अवलंबला. मात्र प्रशासनाकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होताच वातावरण तापले. पोलिसांनी 14 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, तर मोठा पोलिस फौजफाटा रेल्वे ट्रॅक परिसरात तैनात करण्यात आला. अखेर लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने सायंकाळी सर्वांना सोडण्यात आले.
या प्रकरणात प्राप्त माहितीनुसार, वसगडे परिसरातील शेतकऱ्यांची जमीन व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मोबदला, पुनर्वसन आणि पर्यायी रस्ता या प्रमुख मागण्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी संघर्ष करत आहेत. वेळोवेळी रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधी व शेतकरी यांच्यात बैठकाही झाल्या; मात्र ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.
बाधित शेतकऱ्यांनी 31 ऑक्टोबररोजी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत 10 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन सुरू करू, असा इशारा दिला होता. मात्र मुदत संपल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी रेल्वे हद्दीत शांततामय आंदोलन सुरू केले. यावेळी रेल्वे व महाराष्ट्र पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काहींना अर्वाच्च भाषेत बोलल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या कारवाईदरम्यान 14 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.या घटनेनंतर वातावरण तणावपूर्ण बनले असतानाच लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करून प्रशासनाशी चर्चा केली. सायंकाळी सर्व अटक केलेल्यांना सोडण्यात आले. या घटनेनंतर वसगडे येथे तणावपूर्ण शांतता असून मोबदला आणि मार्ग मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे. लवकरच पुढील दिशा ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची निर्णायक बैठक घेण्यात येणार आहे.