

वसंत सावंत
माडग्याळ : जाडरबोबलाद (ता. जत) जिल्हा परिषद गटासह पंचायत समितीचे दोन्ही गण माडग्याळ व जाडरबोबलाद पंचायत समिती सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहेत. जाडरबोबलाद जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाला आहे. माजी आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार गोपीचंद पडळकर तसेच माजी आमदार विलासराव जगताप, तम्मनगौडा रवी-पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. येथे आमदार पडळकर विरुद्ध तम्मनगौडा रवी-पाटील हा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
जाडरबोबलाद मतदार संघात माडग्याळ, व्हसपेठ, गुड्डापूर, अंकलगी, कुलाळवाडी, लकडेवाडी, सोन्याळ, उटगी, जाडरबोबलाद या गावांचा समावेश होतो. गेल्या निवडणुकीत तम्मनगौडा रवी-पाटील विजयी झाले होते. माडग्याळ गणातून विष्णू चव्हाण विजयी झाले होते. जाडरबोबलाद गणातून श्रीदेवी जावीर विजयी झाल्या होत्या.
आता जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते तम्मनगौडा रवी-पाटील यांच्या पत्नी सावित्री तम्मनगौडा रवी-पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेसकडून पूजा एकनाथ बंडगर, जत बाजार समितीच्या सभापती शकुंतला बसवराज बिराजदार यांची नावे चर्चेत आहेत. भाजपाकडून राजश्री संजयकुमार तेली, रंजना विजयकुमार हाके (राजोबाचीवाडी) , श्रुती सार्थक हिट्टी, माजी पंचायत समिती सदस्य महादेवी सोमण्णा हाके (माडग्याळ), व्हसपेठच्या सरपंच पूनम भगवान तुराई, रेणुका रेवणसिद्ध आराणी (जाडरबोबलाद), जाडरबोबलाद सोसायटीचे अध्यक्ष भारत सूर्यवंशी यांच्या पत्नी चिमुताई भारत सूर्यवंशी ही नावे चर्चेत आहेत.
माडग्याळ पंचायत समिती गणासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महादेवी भीमान्ना माळी, रेणुका मारुती बंडगर, काँग्रेसकडून सुजाता माळी, भाजपाकडून सुनंदा विठ्ठल निकम, सिद्धव्वा दत्तात्रय बंडगर, रंजना हाके, निकिता आबांन्ना कांबळे, सविता चंद्रशेखर पुजारी, कावेरी चनबसू चौगुले यांची नावे चर्चेत आहेत. जाडरबोबलाद गणासाठी काँग्रेसकडून विद्या संजय माळकोटगी, राष्ट्रवादी अजित पवार गटातून उटगी येथील कमलाबाई सदाशिव पाटील, भाजपाकडून प्रियांका अनिल पाटील, संगीता जकाप्पा निवर्गी, अश्विनी महेश बिराजदार ही नावे चर्चेत आहेत.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्टवादी अजित पवार गटाचे रवी-पाटील यांना रोखण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. आमदार पडळकर यांचे समर्थक संजय तेली यांनी सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी गावांत जनसंपर्क वाढवला आहे. तम्मनगौडा रवी-पाटील यांचे विरोधक सिद्धू आराणी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचीही येथे मोठी ताकद आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेस तगडा उमेदवार देणार, की राष्ट्रवादी अजित पवार गटाशी युती करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.