कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सांगली-कोल्हापूर रस्त्यावर ठिय्या 
सांगली

सांगली : दर पाडल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

Onion rate : सांगली-कोल्हापूर रस्त्यावर ठिय्या

पुढारी वृत्तसेवा

सांगली : येथील विष्णुअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये व्यापार्‍यांनी कांद्याचे दर पाडल्याने गुरुवारी शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी सांगली - कोल्हापूर रस्ता रोखत कांद्याची पोती रस्त्यावर फेकली. त्यामुळे तणाव निर्माण होत सौदे बंद राहिले. बाजार समितीचे अधिकारी व्यापारी आणि शेतकर्‍यांच्या मागणीवर तोडगा काढला, त्यानंतर सौदे सुरू झाले.

दरम्यान, विनापरवाना आंदोलन केल्याने पोलिसांनी काही शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल केले आहेत. फळ मार्केटमध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. व्यापार्‍यांनी प्रति क्विंटल अडीच ते पाच हजार रुपये इतका दर खाली पाडला. उत्पादन खर्चासह वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले. संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी सांगली ते कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग रोखला. यावेळी विक्रीसाठी आणलेला कांदा महामार्गावर फेकला. यावेळी तब्बल एक तास महामार्गावरील वाहतूक शेतकर्‍यांनी रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून सांगलीतील फळ मार्केटमध्ये जाणूनबुजून व्यापार्‍यांकडून कांद्याचे दर पाडले जात आहेत. इतर जिल्ह्यात दर चांगले मिळत असताना सांगली जिल्ह्यात मात्र व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची लूट सुरू असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला. व्यापार्‍यांनी कांद्याचे दर पाडल्याने बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांच्यासह अधिकार्‍यांनी धाव घेत शेतकर्‍यांसोबत चर्चा केली. तेथे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील आले. यावेळी शेतकरी आणि व्यापार्‍यांशी झालेल्या चर्चेनंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले, त्यानंतर सौदे सुरू झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT