पलूस : दुधोंडी (ता. पलूस) येथील कदममळा ते गणेशनगर हा अत्यंत महत्त्वाचा ग्रामरस्ता सध्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्यावर शेतकऱ्यांकडून हत्ती गवताची लागवड तसेच काही ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याने रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. परिणामी दुहेरी वाहतूक करणे अशक्य असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
या रस्त्यावरून रोज विद्यार्थी, महिला, ग्रामस्थ तसेच मालवाहतूक करणारी वाहने प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या उंच हत्ती गवतामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. विशेषतः सायंकाळच्या वेळेस अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रश्नाकडे आमदार विश्वजित कदम यांचे लक्ष कडेगाव येथे आयोजित एका आमसभेत वेधण्यात आले होते. सुधीर जाधव यांनी कदममळा-गणेशनगर रस्त्यावरील अतिक्रमणाचा मुद्दा थेट आमदारांसमोर मांडला होता. त्यानंतर आमदार कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने अतिक्रमण हटविण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या.
मात्र, संबंधित अधिकारी अद्याप भूमिका घेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ग्रामपंचायतीने जेसीबी व ट्रॅक्टर उपलब्ध करून द्यावेत, आम्ही त्या ठिकाणी येऊन उभे राहतो आणि तुम्ही अतिक्रमण काढून घ्या, असे उत्तर दिले जाते. प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना अतिक्रमण हटविण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा, ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.