Rohit Patil, Sanjaykaka Patil File Photo
सांगली

Sangli District Bank Election Result: रोहित पाटील गटाला मोठा धक्का; माजी खासदार संजयकाका पाटलांचा अवघ्या एका मताने विजय

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तासगाव सोसायटी गटातील अत्यंत चुरशीच्या लढतीत, माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विजय मिळवला आहे.

मोहन कारंडे

Sangli District Bank Election Result

सांगली: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तासगाव सोसायटी गटातील अत्यंत चुरशीच्या लढतीत, माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विजय मिळवला आहे. अवघ्या एक मताच्या फरकाने माजी खासदार संजयकाका पाटील विजयी झाले असून, त्यांना ३९ मते, तर माजी आमदार सुमन पाटील यांना ३८ मते मिळाली आहेत.

या निकालामुळे आमदार रोहित पाटील गटास मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. निवडणुकीदरम्यान एका मतदाराने दोन्ही उमेदवारांना मतदान केल्यामुळे ते मत अवैध ठरले, तर आणखी एक मत बाद झाले. या निवडणुकीतील सहा जागांसाठी मिरजेत ही मतमोजणी सुरू आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांचा विजय

जतमध्ये आ. गोपीचंद पडळकर विरुद्ध विनोद पवार यांच्यातील लक्षवेधी ठरलेल्या लढतीत पडळकर यांचा विजय झाला आहे. जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांना ५४ तर विरोधी विनोद पवार यांना ३४ मते मिळाली आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरू केला आहे.

माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा विजय

कवठेमहांकाळला माजी मंत्री अजितराव घोरपडे विरुद्ध टी. व्ही. पाटील यांच्यात काट्याची टक्कर असल्याने निकालाकडे लक्ष लागले होते. कवठेमहांकाळ सोसायटीकडून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा विजय झाला आहे. अजितराव घोरपडे यांना ३७ मते तर विरोधी टी.व्ही. पाटील यांना ३३ मते मिळाली आहेत. चार मतांनी माजी मंत्री घोरपडे यांनी विजय मिळवला आहे.

२१ जागांपैकी १५ जागा यापूर्वीच बिनविरोध

दरम्यान, जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी १५ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. जिल्ह्यातील सहकारातील आर्थिक सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी १५ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित सहा जागांसाठी १ नोव्हेंबररोजी मतदान झाले होते. या सहा जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यात १२ मतदान केंद्रांवर पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत एकूण २ हजार ४४६ मतदारांपैकी २ हजार २९७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ९३.९१ टक्के विक्रमी मतदान झाले होते. मिरज मार्केट यार्डातील शेतकरी भवनमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे.

मिरज सोसायटी गटात गेली दहा वर्षे खासदार विशाल पाटील हे प्रतिनिधित्व करत होते. मात्र यावेळी पहिल्यांदाच त्यांनी आपले समर्थक अण्णासाहेब कोरे यांना या गटातून उमेदवारी दिली आहे. त्यांचा मोठ्या फरकाने विजय व्हावा, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे या निकालाकडेही सर्वांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT