Sangli District Bank Election : जिल्हा बँकेसाठी चुरशीने ९३.९१ टक्के मतदान

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; मंगळवारच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष
Sangli District Bank Election
Sangli District Bankpudhari photo
Published on: 
Updated on: 

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी जिल्ह्यात अत्यंत चुरशीच्या आणि ईर्षेच्या वातावरणात ९३.९१ टक्के मतदान झाले. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता निकालाकडे लागले असून आघाडीसह भाजपच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सकाळपासूनच सर्वच केंद्रांवर मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला. कडेगाव केंद्रावर सर्वाधिक ९९.३८ टक्के मतदानाची नोंद झाली, तर सांगली केंद्रावर सर्वांत कमी ८४.५८ टक्के मतदान झाले. जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. प्रत्येक केंद्रावर मतदारांची कसून तपासणी करून आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याला मज्जाव करूनच आत प्रवेश दिला जात होता. काही ठिकाणी तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

या निवडणुकीत जत सोसायटी गटात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध आघाडीचे विनोद पवार यांच्यात थेट आणि हायव्होल्टेज सामना रंगला होता. तासगाव सोसायटी गटात माजी खासदार संजय पाटील आणि माजी आमदार सुमन पाटील यांच्यातील पारंपरिक राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून आला. तेेथे दोन्ही बाजूंकडून जोरदार ताकद लावण्यात आली. कवठेमहांकाळ सोसायटी गटात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासमोर आमदार रोहित पाटील यांच्या पाठबळावर टी. व्ही. पाटील यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. मिरज सोसायटी गटात आघाडीचे अण्णासाहेब कोरे आणि भाजपचे अनिल शेगुणशे यांच्यात सरळ लढत आहे. याशिवाय अनुसूचित जाती प्रवर्गातून के. डी. कांबळे, बाबासाहेब मधाळे आणि विलास बेले, तर भटक्या जाती-जमाती प्रवर्गातून संभाजी कचरे, शंकर माने व अमोल पारेकर यांच्यातील लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा बँकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्यासह भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. दिवसभरात पार पडलेल्या या विक्रमी मतदानानंतर आता कोण बाजी मारणार आणि कोणाचा अंदाज अचूक ठरणार, याविषयी तालुक्या-तालुक्यांत राजकीय आडाखे आणि चर्चांना उधाण आले आहे. सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले असून मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीनंतरच विजयाचा गुलाल कोण उधळणार, हे स्पष्ट होईल.

सोसायटी गटात चुरशीने मतदान जिल्हा बँकेच्या तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ आणि जत सोसायटी गटातून चुरशीची निवडणूक पाहायला मिळाली. या चारही ठिकाणी शंभर टक्के मतदान झाले. आता निकाल काय लागतो, याची उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.