जत, पुढारी वृत्तसेवा. शिंगणापूर (ता. जत) येथे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून तीन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवार (दि. १४) ते गुरूवार सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. असे फिर्यादित राजश्री मारुती शेजाळ यांनी नमूद केले आहे. जत पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राजश्री शेजाळ या शिंगणापूर येथील आपल्या घरातून नातेवाईक यांच्याकडे दि. १४ ऑगस्ट रोजी बाहेरगावी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. शेजारी राहत असलेल्या काहीना शेजाळ यांच्या घराचा कोंयडा व कुलूप तोडलेले दिसून आल्याने याबाबतची माहिती राजश्री शेजाळ यांना देण्यात आली. त्यामुळे शेजाळ हे बाहेरगावी हून गुरुवारी परतले. यावेळी त्यांना घरातील साहित्य विस्कटलेले दिसले.
चोरट्याने घरी कोणी नसल्याचे संधीचा फायदा घेत बंद घराच्या दरवाजाचे कुलूप व कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील लाकडी कपाटातील साहित्य विस्कटले व यातील साडे नऊ तोळे सोन्याचे दागिने,७० ग्रॅम चांदीचे दागिने,रोख रक्कम असे मिळून ३ लाखाचा ऐवज लंपास केला आहे. व घरातील सुमारे तीन लाखाचा ऐवज चोरट्याने चोरला असल्याचे निदर्शनास आले त्यांनी याबाबतची जत पोलिसात फिर्याद दिली आहे या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.