सांगली : शहरातील गावभाग परिसरातील भावे वाडा येथे घरात चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत 2 लाख 47 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना दि. 12 जूनरोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली होती. याबाबत सुजाता अनिल पाटील (वय 55) यांनी सांगली शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी सुजाता पाटील या गावभागातील जैन मंदिराजवळील भावे वाडा येथे राहतात. दि. 12 जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. चोरट्याने घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातील लॉकरमधून दोन वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवलेले दोन लाख 47 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
चोरीच्या घटनेनंतर फिर्यादींची तब्येत बिघडली होती. त्यांनी दि. 25 जुलैरोजी शहर पोलिस ठाणे गाठून चोरीची तक्रार नोंदवली. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, पोलिसांनी दोन साक्षीदारांची चौकशी केली आहे. मध्यवस्तीत उघड्या दरवाजातून घरात घुसून चोरी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.