भांबर्डे येथील खुनाच्या खटल्यातील पाच दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. (Pudhari Photo)
सांगली

Vita Crime News | वाळत टाकलेली साडी फाडल्याच्या वादातून हत्या, पाच दोषींना नऊ वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा

खानापूर तालुक्यातील भांबर्डे येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

 Sangli District Court Verdict

विटा : जिल्हा सत्र न्यायालयाने ९ वर्षांपूर्वीच्या एका खुनाच्या खटल्यातील पाच दोषींना आज (दि.१) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विक्रम शिवाजी शिंदे (वय ४०), महेश दिनकर शिंदे (वय ४६), तानाजी पांडुरंग शिंदे (वय ६०), विशाल शिवाजी शिदे (वय ४०) विश्वास गणपतराव भोसले (वय ५०) अशी या दोषी आरोपींची नावे आहेत. हे सर्व सांगली जिल्ह्यातील भांबर्डे (ता.खानापूर) येथील रहिवाशी आहेत. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.आर.भागवत यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून आरती देशपाडे साटविलकर यांनी तर दोषी आरोपींच्यावतीने प्रमोद सुतार आणि सविता शेडबाळे यांनी काम पाहिले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील भांबर्डे येथे नऊ वर्षांपूर्वी १६ मे २०१६ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास महेश शिंदे यांच्या घरासमोर वाळत टाकलेली साडी फाडल्याच्या कारणावरुन आक्काताई यादवराव शिंदे व त्यांचा मुलगा दीपक शिंदे आणि लक्ष्मी शिंदे यांच्यात वादावादी झाली. मात्र, या वादाचा राग मनात धरून विक्रम शिंदे, महेश शिंदे, तानाजी शिंदे, विशाल शिंदे, विश्वास भोसले आणि बाळासाहेब तातोबा शिंदे (रा.विटा) यांनी बेकायदा जमाव जमवून दीपक शिंदे यास लाथा बुक्कांनी मारहाण करुन जखमी केले.

त्या नंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने या सहा जणांनी मिळून मारहाण करुन संगनमताने आपल्या मुलाचा खून केला, अशी फिर्याद आक्काताई शिंदे यांनी विटा पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती. त्यानंतर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे (सध्या पोलीस निरीक्षक कांदिवली, मुंबई) यांनी यातील सर्व सहाही संशयित आरोपींना तत्काळ अटक करुन त्यांच्याविरुद्ध सबळ व पुरेसा पुरावा उपलब्ध केला. या सर्वांविरोधात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले होते.

दरम्यानच्या काळात बाळासाहेब तातोबा शिंदे (रा.विटा) हा मृत्यू पावला. आज न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी विक्रम शिंदे, महेश शिंदे, तानाजी शिंदे, विशाल शिदे, विश्वास भोसले यांना भारतीय दंड विधान संहिता कलम ३०२ चे १४९ खाली जन्मठेप व प्रत्येकी ३० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिन्यांचा कारावास तसेच कलम १४३ खाली ६ महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, शिवाय कलम १४७ खाली २ वर्षाची सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी एक महिना अशी शिक्षा सुनावली.

खटल्याच्या कामी पोलीस फौजदार नवनाथ देवकाते, सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश निकम आणि पोलीस कॉन्स्टेबल नीलम जगदाळे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. दरम्यान, विट्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालय सुरू झाल्यापासून हा पहिलाच जन्मठेपेचा निकाल असल्याने विटा न्यायालयाच्या परिसरामध्ये लोकांनी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT