

कोल्हापूर : अलमट्टीप्रश्नी जाब विचारण्यासाठी सांगली पाटबंधारे कार्यालयावर 10 जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय अलमट्टी उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. अलमट्टीच्या उंचीबाबत समितीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नाही, याबाबत बैठकही घेतलेली नाही. यामुळे अलमट्टीप्रश्नी राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत, रस्त्यावरील लढाईल तीव्र करण्याचा निर्धारही करण्यात आला.
अलमट्टी उंची वाढीविरोधात मे महिन्यात मुंबईत झालेल्या बैठकीत काही प्रश्न उपस्थित केले होते. सरकारने त्यावर आज अखेर काही केले नाही. यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर ही बैठक झाली. विक्रम पाटील म्हणाले, अलमट्टी संदर्भात केंद्रीय जल आयोगाच्या आदेशाचे कर्नाटक पालन करत नाही. राज्य सरकारही त्याकडे गांभीर्याने पाहात नाही. आंदोलनानंतर प्रशासन जागे होते, हे योग्य नाही. माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, पाऊस पूर्वीइतकाच पडत आहे. परंतु अलमट्टी आणि हिप्परगी धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरच पूर येऊ लागला. नदीची पाण्याची पातळी फुटात वाढते व इंचात उतरते. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. शासनाच्या चुकीच्या धोरणाने पुराचा फटका बसत आहे. याविरोधात ताकदीने आंदोलन उभारले पाहिजे.
समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील म्हणाले, अलमट्टीमधून पाणी कमी करण्यास तयार नसलेल्या कर्नाटकची भूमिका हेकेखोरपणाची आहे. यासाठी सांगली, कोल्हापूरचे प्राधिकरण नेमावे. आमदार अरुण लाड म्हणाले, अलमट्टीची उंची वाढविण्यास आव्हान देणारी याचिका केंद्रीय समितीने दाखल केली पाहिजे. याबाबत गंभीर नसलेल्या राज्य शासनाला ताकद दाखविण्याची गरज आहे.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, अलमट्टी व हिप्परगीचा प्रवाह वाढवावा तसेच अलमट्टीची उंची वाढविण्याला विरोध करण्यासाठी सरकारवर दबाव आणला पाहिजे, त्याकरिता रस्त्यावरील व प्रशासकीय लढाई सुरू केली पाहिजे. पूर नियंत्रणासाठी 3200 कोटीचे जागतिक बँकेने कर्ज दिले. त्यातील काही रक्कम प्राप्त झाली ती कोल्हापूर, इचलकरंची आणि सांगलीतील गटारे साफ करण्यास वापरली. यामुळे पूर कसा कमी होईल, असा सवालही त्यांनी केला. अलमट्टी संदर्भातील सरकारची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप करत आमदार सतेज पाटील म्हणाले, याबाबत आम्ही राजकरण करत नाही. मात्र बैठकींना विरोधकांना न बोलवता सरकार राजकारण करत आहे. याबाबत आता रस्त्यावर लढावे लागेल, त्याची सुरुवात या मोर्चाने होईल.
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राजेंद्र सूर्यवंशी, बाबासाहेब देवकर, सम्राट मोरे, दीपक पाटील, भरत पाटील-भुयेकर आदी उपस्थित होते.
वारणा, पंचगंगा नद्यांना पूर नाही. तरीही जून महिन्यातच नृसिंहवाडीतील मंदिरात पाणी कसे गेले? याला कारणीभूत अलमट्टीच आहे. 31 जुलै पर्यंत अलमट्टीमध्ये 50 टक्के पाणी साठा ठेवणे आवश्यक असताना त्यात 65 टक्के साठा असल्याचे आ. लाड यांनी सांगितले.