Atpadi BJP vs Shiv Sena clash
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सुरू असलेल्या चुरशीच्या लढतीमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, विभूतवाडी गावात प्रचारादरम्यान तणावपूर्ण घटना घडली. प्रचाराच्या वेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर थेट राड्यात झाले. या प्रकारात शिवसेनेच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाची तोडफोड करण्यात आली.
निंबवडे जिल्हा परिषद गटात भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी व माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर, तर शिवसेना (शिंदे गट) कडून आय.आर.एस. अधिकारी सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटे या उमेदवारांमध्ये थेट लढत सुरू आहे. त्यामुळे प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर राजकीय तणाव वाढताना दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विभूतवाडी येथे भाजपच्या उमेदवारांचा प्रचार सुरू असतानाच शिवसेनेचे प्रचार वाहन त्या परिसरात दाखल झाले. वाहनावरील ध्वनिक्षेपकाचा आवाज कमी करण्याच्या मागणीवरून प्रथम दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळातच हा वाद चिघळून दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांसमोर आले.
यावेळी जोरदार शिवीगाळ झाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. वादाच्या ओघात शिवसेनेच्या प्रचार वाहनाची तोडफोड झाल्याने काही काळ गावात भीतीचे वातावरण पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून जमाव पांगवला. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच प्रचारादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणी हेमंत तुकाराम मोटे (वय २५, रा. विभूतवाडी) यांनी एम.एच. १२ डब्ल्यू जे ००९८ क्रमांकाच्या ‘छोटा हत्ती’ प्रचार वाहनाचे अज्ञात व्यक्तींनी नुकसान केल्याची तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे यांनी दिली.
या घटनेमुळे निंबवडे जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्व पक्षांनी संयम राखावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक विनय बहीर यांनी केले आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे पालन करत शांततेत प्रचार व्हावा, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.