

विवेक दाभोळे
सांगली : “माझा ऊस चांगला होता, मशीनने तोडला, एकरी किमान 55 टन तरी निघायला हवा होता”, “माझा ऊस मस्त जमला होता. एकरी पन्नास टनाला तरी मरण नव्हते. मशीनने तोडणी केली, पण 35 टनच कसा निघाला?, काटामारी झाली काय?, की तुरे आल्याने वजन घटले..!” ऊसपट्ट्यात आता शेतकऱ्यांत सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे. उसाचा एकरी उतारा विलक्षण घटला आहे. या साऱ्याच चर्चेचे गूढ काय, हे उकलण्याचा प्रयत्न प्रस्तुत प्रतिनिधीने केला असता, एक वेगळेच वास्तव समोर आले. तोडणी यंत्राद्वारे तोड करून उसाचा एकरी उतारा किमान 15 टन घटत असल्याचे स्पष्ट झाले आहे आणि याला केंद्र सरकारच्याच एका संस्थेने आपल्या अहवालात दुजोरा दिला आहे. यामुळे आता यंत्राद्वारे उसाची तोड फायद्याची की घाट्याची, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यात चालू गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र यावेळी साखर कारखान्यांच्या तोडणी यंत्रणेत तुलनेत तोडणी मजुरांची संख्या कमी आहे. परिणामी शेतकरी वैतागून ऊस तोडणी यंत्राद्वारे उसाची तोड करण्यास प्राधान्य देत आहे. पण मजुरांनी केलेल्या उसाच्या तोडीपेक्षा त्याच उसाची तोड यंत्राद्वारे केल्याने एकरी वीस टक्के उसाची हानी होऊ शकते, असे भारत सरकारच्याच केेंद्रीय कृषी यांत्रिकी प्रशिक्षण आणि परीक्षण संस्थेनेच स्पष्ट केले आहे. यासह अन्य विविध प्रकारची तूट, वजावट धरून एकरी तब्बल सरासरी 15 टनाचा घाटा येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी यंत्राद्वारे उसाची तोड केलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. भला मोठा उत्पादन खर्च करूनही ‘हेची फळ काय मम तपाला’ असे म्हणण्याची वेळ या ऊस उत्पादकांवर आली आहे.
तोडणी यंत्राद्वारे केलेल्या तोडीमुळे उसाच्या वजनात विविध प्रकारची मिळून तब्बल 38 टक्के घट येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा आकडा एकरी 15 टनाच्या घरात जातो. आता कारखान्यांनी सरासरी प्रति टन 3500 रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. याचा विचार केला, तर 15 टनाचे नुकसान म्हणजे शेतकऱ्याला एकरी निव्वळ 52 हजार 500 रुपयांचा नाहक फटका सोसावा लागला आहे.
तोडणी यंत्राने ऊस तोडीचा मोठाच फटका
ऊस तोडीसाठी अगतिक झालेला शेतकरी आता ऊस तोडणी मजुरांची मनधरणी करण्याच्या मानसिकतेत राहिलेला नाही. याला कारण तोडणी मजुरांकडून ऊस उत्पादकाची पैशासाठी होणारी अडवणूक होय. आता तर गुंंठ्याला शंभर रुपये आणि वर चहापाणी, वाहनचालकाला एन्ट्री आणि खुशाली, असा ऊसतोडीसाठीही मजुरांनी दरच पाडलेला आहे. यातूनच तोडणीसाठी उत्पादक शेतकरी हा उसाआधीच आर्थिक चरकात पिळून निघू लागला आहे. परिणामी शेतकरी उसाची तोड करण्यासाठी तोडणी यंत्राला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. मात्र यंत्राद्वारे होणाऱ्या उसाच्या तोडीचे फटके आता मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादकाला बसू लागले आहेत. त्याची आकडेवारी याचे गांभीर्य अधिकच स्पष्ट करते.
सांगली जिल्ह्यासह राज्यात देखील आता गळीत हंगाम गतीने सुरू आहे. जवळपास अडीच-पावणेतीन महिन्यांपासून हंगाम सुरू आहे. सलग सात महिने सुरू असलेल्या पावसाच्या साथीनेच यावेळचा गळीत हंगाम सुरू झाला. यावेळी जिल्ह्यात सर्व साखर कारखान्यांकडे ऊस तोडणीसाठी किमान 35 हजारांवर मजूर दाखल झालेले आहेत. मात्र, ही संख्या पुरेशी नसल्याचे सुरुवातीपासून सांगण्यात येत होते. यातूनच तोडणी मजूर टंचाईमुळे तोडणी मजुरांऐवजी यंत्राद्वारे ऊस तोडणीला प्राधान्य देण्याची शेतकऱ्यांची मानसिकता झाली आहे. मात्र याचाही बसत असलेला फटका अतिशय गंभीरतेने समोर आला आहे.
दरम्यान, यावेळी ऊसदर बहुतेक सर्वच साखर कारखान्यांनी 3500 रुपये सरासरी पहिली उचल जाहीर केलेली आहे. जिल्ह्यात गतवर्षीचा (24-25 चा) सरासरी साखर उतारा 11.5 टक्क्यांहून जादा आहे, तर साखर कारखान्यांनी 77 लाख 6 हजार 300 टन उसाचे गाळप करून सर्वसाधारण 81 लाख 46 हजार 890 क्विंटल साखर उत्पादन केले होते. चालू (25-26 च्या) हंगामासाठी जिल्ह्यात 1 लाख 39 हजार हेक्टर ऊस क्षेत्र उपलब्ध होते. यातील सत्तर टक्के क्षेत्रातील उसाची तोड झाली आहे. जिल्ह्याची सरासरी हेक्टरी उत्पादकता 83 टन आहे. मात्र, यंदा सततच्या पावसाने उसाच्या उत्पादनात घट आली आहे. एकरी 40 टन उतारा देखील मिळत नसल्याचे चित्र आहे. तसेच कर्नाटकातील गळीत हंगाम गतीने सुरू आहे. त्यांच्याकडून ऊस पळवला जाईल, या धास्तीने साखर कारखान्यांनी ऊसतोड मजुरांसह यंत्राद्वारे ऊसतोडणी गाळप उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
दुसरीकडे मराठवाड्यात झालेली सिंचनाची सोय, मुलांचे शिक्षण यामुळे आता मजुरांनाही तीन-चार महिने अन्य प्रदेशात ऊस तोडणीसाठी जाणे व्यवहार्य राहिलेले नाही. तशी त्यांची मानसिकता देखील राहिलेली नाही. त्यामुळे दिवसोंदिवस तोडणी मजुरांची संख्या कमी होत असल्याचे दिसते; तर याचवेळी शासनाची भूमिका देखील तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान देण्याची राहिली आहे. यातूनच यंत्रासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान मिळाल्यामुळे तोडणी यंत्रांची संख्या वाढलेली आहे. परिणामी आता ऊस तोडणी ही तोडणी यंत्राद्वारे धूमधडाक्यात सुरू आहे. तोडणी यंत्राने तोड केल्याने उसाचा एकरी उतारा घटतो, असे जर केंद्र सरकारचीच एक संस्था आपल्या अहवालात म्हणत असेल, तर सरकार तोडणी यंत्रांच्या खरेदीसाठी अनुदान का देते? असा सवाल आता संतप्त आणि अगतिक झालेला ऊस उत्पादक करू लागला आहे.
यंत्राद्वारे ऊस तोडीचा फटका...
मजुरांनी केलेल्या उसाच्या तोडीपेक्षा त्याच उसाची तोड यंत्राद्वारे केल्याने एकरी वीस टक्के उसाची हानी होऊ शकते, असे भारत सरकारच्याच केेंद्रीय कृषी यांत्रिकी प्रशिक्षण आणि परीक्षण संस्थेनेच स्पष्ट केले आहे. दरम्यान, याखेरीज उसाला तोड येणार किंवा यावी यासाठी शेतकरी किमान महिना ते दीड महिना आधी उसाला पाणी पाजत नाही, यातून एकरी उसाच्या वजनात किमान दहा टक्केघट होते. यातच भर म्हणून की काय, तोडणी मशीनने तोडलेल्या उसात पाला-पाचोळा, गदळ अशी मिळून साखर कारखाना 5 टक्के तूट धरतो. (ही तूट किती धरायची, हा मुद्दा वादाचा बनलेला आहे.) याखेरीज सर्वात महत्त्वाचे म्हणजे मशीनने तोडलेल्या उसाचे तुकडे तुकडे होतात. यातून उसाचा जास्तीत जास्त पृष्ठभाग हा उघडा पडतो. या उसाच्या तुकड्यांतून किमान तीन टक्के उसाच्या रसाचे उर्ध्वपातन होते. म्हणजे टनाला वजनात तीस किलो घट येते.
तसेच विदेशात तोडणी यंत्राच्या फॅनचा आरपीएम हा 1200 असतो, आपल्याकडील तोडणी यंत्रात हा आरपीएम 2000 केलेला आहे. या प्रचंड वेगामुळे तोडणी करत असताना लहान, कोवळ्या कांड्या दूरवर फेकल्या जातात. त्या गोळा करतो म्हटले तरी हाताला लागत नाहीत. हे होणारे नुकसान मोठे आहे. केंद्र शासनाच्याच संस्थेने हे स्पष्ट केले आहे. या सर्वाची मिळून होणारी एकूण तूट ही जवळपास 38 टक्के होते. हा आकडा एकरी 15 टनाच्या घरात जातो. हा फटका हा केवळ मशीनने उसाची तोड केल्याने बसतो, असे प्रथमदर्शनी तर दिसते. ज्या शेतकऱ्याला एकरी 50 ते 55 टन उसाचा उतारा अपेक्षित होता, त्या शेतकऱ्याला तोडणी यंत्राद्वारे उसाची तोड केल्याने 35 ते 37 टनावरच समाधान मानावे लागले आहे. अर्थात हा सारा दोष पावसालाच आणि बदलत्या वातावरणाला देऊन चालणार नाही, तर यंत्राद्वारे तोड केल्याने देखील शेतकऱ्याला किती फटका बसला याचा देखील विचार होण्याची गरज आहे. परिणामी आता ऊस उत्पादकांची अवस्था चांगलीच बिकट झाली आहे. आधीच पावसाने उसाची वाढ झालेली नाही, परिणामी एकरी उतारा घटला आहे. यामुळे यंत्राद्वारे उसाची तोड केल्याने होणाऱ्या तुटीचा बसणारा फटका हा शेतकऱ्यांचे आर्थिक गणित उद्ध्वस्त करू लागला आहे.
आजारापेक्षा उपायच भयंकर
भारत सरकारच्या बुधनी (मध्य प्रदेश) येथे असलेल्या केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण आणि परीक्षण संस्थेने शक्तिमान सेल्फ प्रोपेल्ड शुगरकेन हार्वेस्टर या मॉडेलद्वारे झालेल्या ऊस तोडणीचा अभ्यास करून हा अहवाल याआधीच जाहीर केला आहे. यामुळे तोडणी यंत्राद्वारे उसाची तोड करणे कितपत सोयीस्कर आणि फायद्याचे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. तोडणी मजुरांकडून होणाऱ्या ऊस तोडीसाठीच्या अडवणुकीला वैतागून अनेक ऊस उत्पादक तोडणी यंत्राद्वारे ऊस तोडणीस प्राधान्य देत आहेत. मात्र हा उपाय आजारापेक्षा भयंकर ठरत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
ऊस तोडणी यंत्रे वाढली
या हंगामात जिल्ह्यात किमान 325 हून अधिक तोडणी यंत्रांद्वारे ऊसतोडणी होत आहे. उसाची तोड झटपट होत असल्याने शेतकरीही तोडणी मजुरांऐवजी यंत्राद्वारे तोडणीला प्राधान्य देत आहेत. साधारणपणे प्रतिदिन 10 हजार टनाहून अधिक गाळपक्षमता असलेल्या मोठ्या कारखान्यांकडे प्रत्येकी किमान 35 ते 40, तर लहान लहान साखर कारखान्यांकडे 15 ते 20 तोडणीयंत्रे ऊस तोडणीचे काम करत असल्याचे सांगण्यात येते.