सांगली : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका महाविद्यालयीन अल्पवयीन युवतीवर सांगली-मिरजेतील कॅफेमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित युवतीने विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित अरिहंत संजय छंचुरे (वय 19, रा. बजरंगनगर, कुपवाड) याला अटक केली असून त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार आणि सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित युवती अल्पवयीन असून एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. संशयित अरिहंत याने ओळख वाढवून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याने पीडितेला एका कॅफेमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याने तिचे फोटोही काढले. नंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 20 नोव्हेंबर 2023 पासून सांगली आणि मिरजेतील कॅफेमध्ये तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. 16 ऑक्टोबर रोजी संशयित अरिहंत याने पीडितेचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केले.
सांगली-मिरजेतील अनेक कॅफे वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. या कॅफेमध्ये अश्लील चाळे केले जात असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले होते. काही युवतींवर बलात्काराच्या घटनाही घडल्या आहेत. याविरोधात शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने आंदोलन छेडले होते. कॅफेमध्ये कंपार्टमेंट बनवून तरुणांना अश्लील चाळे करण्याची सोय केली होती. आंदोलनानंतर कॅफेमधील कंपार्टमेंट काढून टाकण्यात आली. पण अजूनही अनेक कॅफेमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा कॅफेची तपासणी करून गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी होत आहे.