सांगली ः पुढारी वृत्तसेवा
सांगली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात शुक्रवारीही पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले होते. दिवसभर ढगाळ वातावरण होते. दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने धरणातून 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदा उन्हाळ्यापासून पावसाचा जोर कायम आहे. अवकाळी पाऊस जिल्ह्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात झाला. त्यानंतर मान्सूनचे आगमन वेळेवर झाले. अपवाद वगळता मेपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा विक्रमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक पिकांना फटका बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस येत असल्याने विश्रामबाग ते कुपवाड फाटा या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. हे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांना ये-जा करणे अवघड बनले आहे. त्यातून अनेकवेळा अपघात होत आहेत. शहरात सकाळीच जोरदार पाऊस झाला. दुपारनंतर सातत्याने पाऊस सुरू होता. पुढील काही दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
देवराष्ट्रे : सोनहिरा खोर्यात सलग तीन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. ओढे, नाले, वगळीं भरून वाहत आहेत. तसेच येरळा नदीही दुथडी भरून वाहत आहे. बुधवारी सायंकाळपासून तर पावसाने थैमान घातल्याचे दिसत आहे.