कवठेमहांकाळ; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ची कवठेमहांकाळ तालुक्यातील महामार्गाची अपूर्ण कामे पूर्ण करावीत. तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान संयुक्त मोर्चाच्या लढ्याला तसेच मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शिरढोण गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले. तसेच विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे शिरढोण येथे नॅशनल हायवेवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
शिरढोण येथील अग्रणी नदीवरील हायवे ब्रीजशेजारी सर्व्हिस रस्त्यावर दोन्ही बाजूला नवीन पूल तातडीने बांधून मिळावा, शिरढोण गावातील सर्व्हिस रोडलगतचे गावात जाणारे सर्व रस्ते डांबरीकरण करून मिळावेत, अपूर्ण गटारी पूर्ण करा, बाधीत शेतकर्यांच्या फेरसर्व्हेच्या निवाडा नोटीसा तातडीने मिळाव्यात, नरसिंहगाव येथील अपूर्ण सर्व्हिस रोड पूर्ण व्हावा, सर्व्हिस रोडलगतचे गावात जाणारे सर्व रस्ते डांबरीकरण करावेत, बोरगाव टोलनाक्याच्या 20 कि.मी. परिघातील स्थानिक वाहन धारकांना टोल निःशुल्क करा, अलकुड एम येथे गावाजवळ सर्व्हिस रोडवर गतिरोधक करा आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पोलिसांनी दिगंबर कांबळे व सर्व शेतकरी, नागरिकांना ताब्यात घेतले. स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. संजय पाटील, रजनीकांत पाटील, मोहन पाटील, प्रभाकर पाटील, अंकुश कदम, शिरढोणच्या सरपंच शारदा पाटील, आशाराणी पाटील, मीनाक्षी कदम, किरण पाटील, अंकुश कदम, सचिन सोनवणे, शिवाजी कदम, प्रवीण पाटील, मंगल पाटील, भारत पाटील, वैभव सरवदे व शेकडो शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनानंतर 25 जणांवर गुन्हा दाखल झाला. शेकापचे दिगंबर कांबळे यांच्यासह मोहन पाटील, भारत पाटील, दीपक शिंदे, प्रभाकर पाटील, किरण पाटील, प्रवीण पाटील, शिवाजी कदम, गोविंद चव्हाण, सत्यजित पाटील, साहेबराव पाटील, प्रतिमा पाटील, शारदा पाटील, मीनाक्षी पाटील, ज्ञानदेव कदम, अरुण भोसले, तुषार ढोबळे, रजनीकांत पाटील, माणिक पाटील, अरुण पाटील, आशाराणी पाटील, अंकुश कदम, सचिन सोनावणे, सखाराम पाटील, देविदास बाबर आदींसह 25 जणांवर गुन्हा दाखल झाला.
हेही वाचा :