आमदार सुहास बाबर यांनी मुंबईत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची घेतली भेट  Pudhari
सांगली

Powerloom Online Registration | यंत्रमाग धारकांना दिलासा: ऑनलाईन नोंदणीसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ; ‘सेल्फ डिक्लेरेशन’लाही मान्यता

Suhas Babar meet Sanjay Savkare | आमदार सुहास बाबर यांनी मुंबईत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची घेतली भेट

पुढारी वृत्तसेवा

Textile Industry Issues

विटा : यंत्रमाग धारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने ऑनलाईन नोंदणीसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. नोंदणी प्रक्रियेसाठी ‘सेल्फ डिक्लेरेशन’ (स्वयंघोषणापत्र) स्वीकारण्याची मुभा देण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली आहे.

राज्यातील विकेंद्रित वस्त्रोद्योग घटकांना वीजदरात सवलत देण्यासाठी शासनाने धोरण जाहीर केले असले, तरी त्यासाठी आवश्यक असलेली ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया यंत्रमाग धारकांसाठी अडचणीची ठरत होती. नोंदणी अर्ज अत्यंत किचकट व विस्तृत असल्याने अनेक धारकांना वेळेत नोंदणी पूर्ण करता आलेली नव्हती. त्यामुळे सवलतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती.

या पार्श्वभूमीवर विटा येथील यंत्रमाग धारकांनी अनिल यंत्रमाग संघाचे अध्यक्ष व नगरसेवक वैभव म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुहास बाबर यांची भेट घेऊन समस्या मांडली होती. या समस्येची दखल घेत आमदार बाबर यांनी मुंबईत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची भेट घेतली.

यावेळी साध्या यंत्रमागांना ऑनलाईन नोंदणीतून सूट द्यावी किंवा मुदतवाढ द्यावी, तसेच नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी आमदार बाबर यांनी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री सावकारे यांनी नोंदणीसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ जाहीर केली. तसेच, प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीऐवजी ‘सेल्फ डिक्लेरेशन’ सादर करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे खानापूर तालुक्यासह राज्यातील हजारो यंत्रमाग धारकांना मोठा दिलासा मिळाला असून, नोंदणीतील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे यंत्रमाग धारकांकडून स्वागत केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT