कडेगाव : रजाअली पिरजादे : हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम ठेवत आणि सामाजिक सलोखा जपत, कडेगाव येथे मोहरम उत्सवात साजरा करण्यात आला. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानी हा मोहरम उत्साहात साजरा झाल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांनी या उत्सवाला हजेरी लावली.
पावसाअभावी यावेळी ताबूत मिरवणूक व भेटीला फाटा देत, ताबूतांचा प्रतिकात्मक भेटी सोहळा संपन्न झाला. यावेळी कोरोनासह अन्य आजारांचे संकट दूर कर आणि विश्व शांतीसाठी अल्लाह आणि पैगंबरांचे नातू हजरत इमाम हसन आणि हुसेन यांच्याकडे प्रार्थना करण्यात आली.
कडेगाव येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण व यानिमित्त होणारे उंच ताबूत सर्वत्र प्रसिद्ध आहे. येथील मोहरांची परंपरा वेगळी आहे. याठिकाणी मोहरमनिमित्त १४ ताबूत बसवले जातात. यापैकी कित्येक ताबूत हे हिंदू बांधवांचे असतात.
मागील दोन वर्षात कोरोना या महामारीच्या संकटामुळे मोहरम सण शांततेत पार पडला. यावर्षी मोहरम सण उत्साहात साजरा झाला, मात्र मागील दोन दिवसात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे लाकडी बांबू व मातीच्या साहाय्याने बनवलेले गगनचुंबी ताबूतांच्या गळा भेटी व मिरवणूक सोहळ्याला फाटा देत प्रतिकात्मक भेटी सोहळा संपन्न झाला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला होता.