सांगली

Kadegaon Mahurram : कडेगाव येथे गगनचुंबी ताबूतांच्या भेटीचा सोहळा उत्साहात; हजारो भाविकांची उपस्थिती

अविनाश सुतार

कडेगाव : प्यारा प्यारा हमारा देश प्यारा… अब एकीका कर दो पुकारा… 'हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे' अशी ऐक्याची हाक देणारा आणि सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबूतांसाठी कडेगावचा मोहरम (Kadegaon Mahurram) प्रसिद्ध आहे. ताबूत भेटीचा दिमाखदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा हजारों भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने थाटात संपन्न झाला. हा भेटी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते. विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती.

सांगली जिल्ह्यातील कडेगावात (Kadegaon Mahurram) गेली १५० वर्षांपासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजही ही परंपरा चालू वर्षीच्या मोहरम सणात दिसून आली. शनिवारी (दि. २९) सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापुर, सोहोली, निमसोड, वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत- गाजत आणण्यात आले. त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजाअर्चा करून सकाळी ११ वाजता मानाचा सात भाई ताबूत उचलण्यात आला. येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला. हा ताबूत वीजबोर्डाजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर बागवान, आत्तार, शेटे, माईनकर आणि अन्य ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले. त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला. आणि सातभाई- पाटील, सातभाई – बागवान, सातभाई – आत्तार, सातभाई – माईनकर हकीम, या उंच ताबूतांच्या प्राथमिक भेटी ११.३० वाजता संपन्न झाल्या.

सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी

या भेटी म्हणजे राम-भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे टोप्या उंचावून त्यांचे स्वागत केले. आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटला. त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) कडे निघाले. यावेळी इमाम हुसेन झिंदाबाद, मौला अली झिंदाबाद, धुला.. धूला अशा घोषणा देण्यात येत होत्या. दरम्यान वाटेत तांबोळी, शेटे व अन्य ताबूत सहभागी झाले. त्यानंतर मानकऱ्यांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत आणले गेले. सर्व ताबूत मानाप्रमाणे सुरेश बाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) या ठिकाणी एकत्रित केले गेले. त्या ठिकाणी मेलवाल्याकडून "महान भारत देश अमुचा घुमवू जय जयकर","तसेच प्यारा प्यारा हमारा देश प्यारा, अब एकीका कर दो पुकारा' 'हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे" अशी ऐक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली.

 Kadegaon Mahurram : हिंदू मानकऱ्यामार्फत मसूद माता ताबूत पंजे

त्यानंतर हिंदू मानकऱ्यामार्फत मसूद माता ताबूत पंजे, बारा इमाम पंजे मानकऱ्यामार्फत आणण्यात आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला. मानाप्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने भेटीचा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झाले. दुपारी २.३० वाजता भेटी सोहळा आटोपून सर्व ताबूत आपल्या जागी येऊन बसले. दरम्यान सकाळी ७ पासून विटा, कराड, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबईसह कर्नाटकातून लोक मिळेल, त्या वाहनाने कडेगावला येत होते. गावातील रस्ते, गल्ली बोळ आबालवृद्धांनी गजबजून गेले होते. तसेच महिलांची व युवकांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता. मान्यवरांसाठी खास स्टेज उभारण्यात आला होता. यावेळी नगरपंचायतकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मोहरम भेटी सोहळा पाहण्यासाठी माजी मंत्री व आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, माजी आमदार मोहनराव कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जि. प. अध्यक्ष संग्रामसिह देशमुख, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, डॉ. जितेश कदम, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, चंद्रसेन देशमुख, सुरेश निर्मळ, गुलाम पाटील, डी. एस. देशमुख, दीपक भोसले, विजय शिंदे, रविंद्र देशपांडे, तहसीलदार अजित शेलार, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम आदीसह नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, हिंदू-मुस्लिम बांधव, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT