Flood situation Atpadi Khanapur
आटपाडी : दिघंची (ता. आटपाडी) परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी चिखलातून पायपीट करत थेट शेतात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेत त्यांनी लवकरच मदतीचा हात देण्याची ग्वाही दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
पाहणी दरम्यान आमदार बाबर यांनी कृषी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तहसीलदार शीतल बंडगर, उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश कुंभार, कृषी अधिकारी मारुती कौलगे, तलाठी चंद्रकांत कदम, माजी सरपंच अमोल मोरे, मुन्ना तांबोळी, बाळासाहेब होनराव,दत्तात्रय पाटील, सभापती संतोष पुजारी आदी मान्यवर त्यांच्यासोबत होते.
दिघंची येथील परिसरात पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे संकट गहिरे झाले आहे.भक्तीमळा व पूसावळे मळा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून पेरलेली ऊस,ज्वारी, मका ही पिके अक्षरशः वाहून गेली आहेत. डाळिंब, पेरू बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अन्नधान्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. भक्तीचा मळा भागात डुक्कर खिळा तलावाच्या पाण्यामुळे देखील नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी या वेळी पाणंद रस्ते व वहिवाट रस्ते खुले करून देण्याची मागणीही आमदारांकडे केली. सोमनाथ पुसावळे, दत्तात्रय पुसावळे, नामदेव पुसावळे यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांचीही पाहणी करण्यात आली. आता लवकरच पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे.
पीक नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार बाबर यांनी केली. त्यांनी चिखल तुडवत, पाणी ओलांडत ते थेट शेतात गेले आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आमदार बाबर यांनी तात्काळ दखल घेतल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
पिकांचे नुकसान झाल्याबद्दल शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी मारुती कौलगे यांना सांगितले होते.परंतु याबाबत त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. आमदार, उपविभागीय कृषी अधिकारी येताच मात्र तालुका कृषी अधिकारी पाहणीला हजर राहिले. याबाबत शेतकऱ्यांनी आमदारांकडे तक्रार केली.