

सांगली : सांगली शहरासह सर्वच तालुक्यांत गतवर्षीच्या पावसाच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाला. मात्र यंदा कमी कालावधीत जास्त पाऊस झाला. त्यामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच्या नुकसानीचे पंचनामे होण्याअगोदरच पुन्हा पाऊस झाल्यामुळे पंचनामेही व्यवस्थित नाहीत अन् भरपाई नाही, अशी शेतकर्यांची स्थिती आहे.
हवामान विभागाने यंदाही जोरदार पाऊस असेल, असा अंदाज वर्तवला होता. यंदा मान्सूनपूर्व पाऊस जोरदार झाला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. ओढे, नाल्यांना पूर आले. मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात साधारणत: 7 जूनला होत असते. यंदा मात्र मान्सून मे महिन्यात दाखल झाला. त्यामुळे मे महिन्याचा उन्हाळा जाणवलाच नाही. त्यानंतर जून महिन्यातही सातत्याने पाऊस झाला. यामुळे तलाव, धरणांच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाली. धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, वारणा, राधानगरी ही धरणे 70 टक्केहून अधिक भरली. जिल्ह्यातील तलावांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. जूनमध्ये ऐन पेरणीच्या वेळी सातत्याने पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांना पेरणी करता आली नाही. काहींना दुबार पेरणी करावी लागली. त्याचा फटका शेतकर्यांना बसला.
यंदाही महापूर येणार की काय, याची धास्ती लोकांच्या मनात सुरुवातीला तयार झाली. मात्र जुलै महिन्यात यंदा पाऊस कमी पडला. सन 2005, सन 2019, सन 2020 यावर्षी मोठे महापूर आले. आतापर्यंत पुराची स्थिती ही साधारणत: जुलैचा शेवटच्या आठवडा ते ऑगस्टचा पहिला पंधरवडा यादरम्यान होत होती.
यंदा मात्र जुलै व ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात फारसा पाऊस आला नाही. मात्र 15 ऑगस्टपासून जोरदार पाऊस सुरू झाला. 15 ते 20 ऑगस्ट या सहा दिवसाच्या कालावधीत कोयना येथे 805 मि.मी., नवजा येथे 1246 मि.मी. व महाबळेश्वर येथे 878 मि.मी. पाऊस झाला. कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस झाला. पाच दिवस कृष्णा पाणलोेट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण मुसळधार होते. सांगलीसह जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून राहिले. त्यानंतर पावसाने काही दिवस विश्रांती घेतली. मात्र शनिवारपासून पुन्हा तीन दिवस जोरदार पाऊस झाला. कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने शेतीतील पिकांचे विशेषत: काढणीला आलेले सोयाबीन, भाजीपाला, कडधान्ये या पिकांचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर प्रत्येक वेळी सरकारने प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र अनेक ठिकाणी पंचनामे पूर्ण करता आले नाहीत. पंचनामे केले, मात्र भरपाई मिळालेली नाही. कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.