

सांगली : मे महिन्यापासून सुरू असलेल्या सलग पावसामुळे शेतीपिकांची अपरिमित हानी झाली आहे. मात्र नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. सलग दुसरा हंगाम पावसाच्या लहरीपणामुळे वाया गेला आहेे.
यावेळी पावसाने शेतीला मोठाच फटका बसला आहे. पावसाळाच मुळात महिना सव्वा महिना आधी सुरू झाला. मेपासून सुरू झालेल्या पावसाने शेतकर्यांना जूनअखेरपर्यंत पेरणीच करून दिली नाही. पेरणी हंगाम संपल्याने जिल्ह्यात मोठे क्षेत्र पेरणीविना राहिले. यातून शेतकर्यांना मोठाच फटका बसला. जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात पेरणी करण्यासाठी उसंत मिळाली. मात्र तोपर्यंत पेरणीचा हंगाम संपला होता. मागास पेरा साधत नाही, म्हणून बहुसंख्य शेतकर्यांनी शेतात पेरणीच केली नाही. यामुळे मोठे क्षेत्र पेरणीविना राहिले आहे. यातून शेतकर्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरीची उघडीप सोडली तर आता पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठेच नुकसान होऊ लागले आहे. प्रामुख्याने बहुतेक ठिकाणी सुरू असलेल्या सोयाबीनच्या काढणी- मळणीला या पावसाने ‘ब्रेक’ दिला आहे. परिणामी यातून आता सोयाबीनचे नुकसान झाले आहे. जेमतेम साधलेल्या पिकांचीही पावसात भिजल्याने मोठी हानी होऊ लागली आहे.
विशेष म्हणजे यावेळी सलग दुसरा खरीप हंगाम शेतकर्यांसाठी हानीकारक ठरला आहे. गेल्या वेळीही पावसाने जूनअखेर दडी मारल्याने शेतकर्यांना पेरणीच करता आली नव्हती. परिणामी हंगाम लांबल्याने त्यातून शेतीचे मोठे नुकसान झाले होते. थोड्याबहुत फरकाने यावेळीदेखील त्याचीच प्रचिती येत आहे. दरम्यान, चालू हंगामातही जिल्ह्यात खरिपाचे मोठे क्षेत्र पेरणीविना राहिले आहे. या क्षेत्राचे पंचनामे करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.