मिरज : मिरज तालुक्यातील एका गावात मूल होण्यासाठी औषध देण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या भामट्याने या दाम्पत्याचे 40 हजारांचे दागिने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी संबंधित दाम्पत्याने अनोळखी भामट्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी हे मिरज तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहेत. त्यांना एकाने मूल होण्यासाठी औषध देण्याचे आमिष दाखवले. त्यापूर्वी घरामध्ये काही विधी करण्यास सांगितले. विधी करण्यासाठी संबंधित भामटा फिर्यादीच्या घरी आला. त्याने पती-पत्नीस घरातील देव्हार्याजवळ बसवले. तेथे फिर्यादी व यांच्या पत्नीच्या अंगावरील सर्व सोन्याचे दागिने ब्लाऊज पिसवर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्याने घरातील पितळी हंड्यात दागिने ठेवल्याचा बहाणा केला.
त्यानंतर ‘दोघांनीही वीस मिनिटे जागेवरून उठायचे नाही, तोपर्यंत मी मंदिरात जाऊन येतो’, असे सांगून त्याने पोबारा केला. बराच वेळ होऊनही तो घरी न आल्याने संबंधित दाम्पत्याने शोधाशोध सुरू केली. परंतु तो मिळून आला नाही.
दरम्यान, घरातील हंड्यात दागिनेही नव्हते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे दाम्पत्याच्या निदर्शनास आले. त्यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधिताविरुद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.