

Miraj murder case
मिरज : मिरज रेल्वे स्थानकात सोमवारी रात्री मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. सतीश बाबुराव मोहिते (वय 40, रा. इचलकरंजी रस्ता, हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. अवघ्या दोनशे रुपयांसाठी ही घटना घडली. याप्रकरणी संतोष ऊर्फ संजय दुर्गा निंबाळकर (वय 38, रा. तिवटणा, जि. परभणी) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
सतीश आणि संशयित संतोष हे दोघे सोमवारी रात्री दारू पिण्यासाठी दुकानात गेले होते. सतीश हा मिरज रेल्वे स्थानकात आला. संतोषही त्याच्यापाठोपाठ आला. संतोष याने सतीश याच्याकडे दारूसाठी पैशाची मागणी केली. परंतु सतीश याने पैसे देण्यास विरोध केला. रागाच्या भरात संतोष याने सतीशच्या डोक्यात काठीने बेदम मारहाण केली होती.
वर्षभरापासून सतीश घरीच परतला नाही
सतीश हा हातकणंगले येथील रहिवासी होता. परंतु वर्षभरापूर्वी त्याने घर सोडले होते. तेव्हापासून तो घरी परतलाच नव्हता. मिळेल ते काम करणे तसेच रस्त्यावर पडलेल्या बाटल्या आणि भंगार गोळा करण्याचे काम तो करीत होता. तसेच तो मिरज ग्रामीण आणि मिरज शहर बस स्थानकात राहत होता, असे पोलिसांनी सांगितले.