

कुपवाड : मिरज एमआयडीसीतील सुयश ऑटोमोबाईल कास्टिंग प्रा. लि. (प्लॉट नंबर 63) या कंपनीत काम करत असताना कन्व्हेयर बेल्टमध्ये अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी, 12 जुलैरोजी दुपारी 2:40 वाजता उघडकीस आली. या घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात केली आहे. सोमनाथ अशोक माळी (वय 20, रा. कवठेमहांकाळ) असे मृत कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ माळी नेहमीप्रमाणे कंपनीत काम करत असताना दुपारी अचानक ते कन्व्हेयर बेल्टमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत कंपनीतील कामगार सूरज पंडित दळवी यांनी ‘आयुष हेल्पलाईन’ टीमच्या मदतीने त्यांना मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कुपवाड पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ माळी महिन्याभरापूर्वीच या कंपनीत कामाला लागले होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.