जालिंदर हुलवान
मिरज : महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून मिरजेत 12 पैकी नऊ किंवा दहा विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी कापली जाणार आहे. त्यामुळे मैदानात भाजपकडून नवी फौज दिसणार आहे. केवळ दोन किंवा तीन विद्यमान नगरसेवकांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदारपणे सुरू आहे. मिरजेत प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच, सहा, सात आणि वीस असे एकूण सहा प्रभाग आहेत. एकूण 78 नगरसेवकांपैकी 23 नगरसेवक हे मिरजेच्या या एकूण सहा प्रभागातून निवडून गेले होते. त्यापैकी प्रभाग क्रमांक तीन, चार आणि सात या तीन प्रभागांमधून 12 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून गेले होते. या तीन प्रभागांमध्ये भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी सुमारे शंभरहून अधिकजण इच्छुक आहेत. भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कधी मिरजेत, कधी सांगलीत, तर कधी मुंबईत उमेदवारी फिक्स करण्यासाठी बैठका सुरू आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोनच दिवसांचा अवधी आता उरला आहे. तरी देखील भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. मात्र भाजपने मिरजेतील एकूण 12 नगरसेवकांपैकी केवळ दोन ते तीन विद्यमान नगरसेवकांनाच या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्याचे ठरवल्याची माहिती मिळाली.
प्रभाग क्रमांक तीनमधून अनिता वनखंडे, शिवाजी दुर्वे, शांता जाधव, संदीप आवटी हे चार भाजपकडून नगरसेवक होते. या चारपैकी तिघांचा पत्ता कट झाला आहे. येथे एकाच विद्यमान नगरसेवकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अन्य तिघे नवे चेहरे भाजपचे उमेदवार म्हणून दिसणार आहेत. प्रभाग क्रमांक चारमध्ये पांडुरंग कोरे, अस्मिता सलगर, मोहना ठाणेदार, निरंजन आवटी हे चार नगरसेवक भाजपचे होते. या प्रभागात देखील केवळ एकाच विद्यमान नगरसेवकाला भाजप उमेदवार म्हणून संधी देणार आहे. अन्य तीन नगरसेवकांचा पत्ता कट करण्यात येणार आहे. या प्रभागात देखील अन्य तीन उमेदवार हे नवे दिसणार आहेत.
प्रभाग क्रमांक सातमध्ये देखील भाजपचे चार नगरसेवक होते. येथे आनंदा देवमाने, संगीता खोत, गायत्री कल्लोळी, गणेश माळी हे भाजपचे विद्यमान चार नगरसेवक होते. या प्रभागात देखील केवळ एकाच विद्यमान नगरसेवकाला भाजपची उमेदवारी मिळू शकते. येथे तिघा विद्यमान नगरसेवकांचा पत्ता भाजपकडून तर कट झाला आहे.