

मिरज : मिरज वाहतूक शाखा सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या कारणातून चर्चेत आहे. परजिल्ह्यातून व कर्नाटकातून येणाऱ्या वाहनधारकांची अक्षरश: लूट केली जात असल्याच्या वाहनधारकांच्या तक्रारी आहेत. कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणात मलई घेतली जाते. मलई घेण्यासाठी आता चक्क पानटपरी चालकाच्या स्कॅनरचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिरज शहर हे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. तसेच शहरालगत राष्ट्रीय महामार्ग असल्याने या ठिकाणी सातारा, सोलापूर, पुणे इत्यादी जिल्ह्यातील नागरिकांची मिरजेत नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे ‘एमएच 09’, ‘एमएच 11’, ‘एमएच 13’, ‘एमएच 12’, ‘एमएच 14’, तसेच कर्नाटकातील ‘केए’ पासिंगची वाहने दिसल्यास त्या वाहनांवर कारवाई ठरलेलीच.
तसेच मिरजेत रेड लाईट एरिया असल्याने परजिल्ह्यातील अनेकजण या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी येणाऱ्या वाहनांवर तर वाहतूक पोलिस टपलेलेच असतात, तसेच शहरातील रिक्षाचालक, वडाप व्यावसायिकांकडून वाहतूक पोलिसांना नियमितपणे मलई ठरलेलीच.
शहरात येणाऱ्या वाहनधारकांना अडवून कोणत्या ना कोणत्या कारणातून दंड केलाच जातो. हा दंडही काही कमी नाही. पाच, दहा हजार अशा पटीतच. त्यामुळे कारवाई टाळायची असेल, तर मलई देणे ठरलेलेच. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना वाहतूक पोलिस मात्र ‘अनऑफिशिअल’ कारवाई करण्यामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येते. असे ‘ऑफिशिअल’ आणि ‘अनऑफिशिअल’ दंड करण्यामध्ये मिरज वाहतूक पोलिसांनी बाजी मारली आहे. आता मलई हातावर ठेवली तर ठीक, पण जर मलई ‘ऑनलाईन’ असेल, तर मात्र हे बहाद्दर ताकही फुंकून पितात म्हणे.
मिरज वाहतूक शाखेकडे नेमणुकीस असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा कारनामा शहरात चांगलाच चर्चेत आहे. सहा महिन्यांपूर्वी या कर्मचाऱ्याने एका वाहनधारकाकडून मलई घेतली. त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमातून चांगलाच व्हायरल झाला होता. आता त्याच कर्मचाऱ्याचा नवा कारनामा समोर आला आहे.
मिरज बस डेपोपासून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वन वेमधून जाणाऱ्या परजिल्ह्यातील एका मोटारचालकाला त्याने अडविले. त्याला वन वे तोडल्याच्या आणि ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’च्या गुन्ह्याखाली कारवाई करण्याची भीती दाखवली. पोलिस ठाण्यातही नेले. कारवाईची भीती दाखवत पाच हजार रुपये दंड ठोठावण्याची धमकी दिली. संबंधित मोटारचालकाने फोनाफोनी केली. मग सहानुभूती म्हणून त्या मोटारचालकाला त्याने सोडले. पण तेही मोठी मलई घेऊनच.
मात्र मलई घेण्यासाठी केलेली हुशारी त्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. या बहाद्दराने कोल्हापूर रस्त्यावर असणाऱ्या एका पान टपरी चालकाचा ‘क्यूआर कोड’ वापरला. त्याच्याकडून 3 हजार 500 रुपये उकळले. त्यामुळे मिरज वाहतूक शाखेकडील खाबुगिरीचे नवनवे किस्से समोर येत आहेत. परिणामी मिरज वाहतूक शाखा चांगलीच चर्चेत आहे.
तत्कालीन पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी मिरज वाहतूक शाखेला चांगलाच झटका दिला होता. या शाखेकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, तसेच कर्नाटकातून येणाऱ्या वाहनधारकांवर विनाकारण कारवाई करण्यास मज्जाव केला होता. आता पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनीही मिरज वाहतूक शाखेच्या अनागोंदी कारभाराची गांभीर्याने दखल घ्यावी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा वाहनधारकांतून व्यक्त होत आहे.