सांगली : पुढारी वृत्तसेवा
कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून त्यांचा निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर (मार्ड) तीन दिवसांपासून संपावर आहेत. त्यामुळे रुग्ण सेवेवर परिणाम झाला आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालय आवारात मार्ड आणि महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशनच्यावतीने आज, शुक्रवारी कँडलमार्च काढून निषेध करण्यात आला.
कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ 90 निवासी डॉक्टर तीन दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. त्यांच्याकडून अत्यावश्यक सेवा सुरू आहे. डॉक्टर संपावर गेल्याने ओपीडी सेवेवर आणि रुग्णालयातील काही सेवेवर परिणाम झाला आहे. रुग्णालयातील सहायक प्राध्यापक आणि डॉक्टराकडून सेवा सुरू आहे.याबाबत शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी सांगितले की, निवासी डॉक्टर जबाबदारीच्या जाणिवेतून अत्यावश्यक सेवा देत आहेत. रुग्ण सेवेवर किरकोळ परिणाम झाला आहे. प्राध्यापक डॉक्टर अधिक सेवा देत आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी मार्ड आणि महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशनच्यावतीने पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या आवारात कँडल मार्च काढून निषेध व्यक्त करण्यात आला. यामध्ये नर्सेस फेडरेशन संघटनेचे शोभा मोहिते, प्रकाश आवळे, अल्ताफ नदाफ, प्रशांत कोळी, जास्मिन पटेल, परिणिता सॅम्युएल, सुहास रेपे, विजय पाटील, मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशीष सचदेव, डॉ. अवेज शेख, डॉ. अक्षय डांगे आदी सहभागी झाले होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव व डॉ. श्रीकांत अहंकारी यांना निवेदन देण्यात आले.