पश्चिम बंगालमधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात असलेली डॉक्टरामधील भीतीची परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलण्यासंदर्भात केंद्र सरकारसोबत संपर्क साधला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला दिले. मात्र तरीही निवासी डॉक्टरांनी आपला संप कायम ठेवला आहे. शुक्रवारपासून हा संप अधिक तीव्र करण्याचा निर्णय मार्डकडून घेण्यात आला आहे.
मंगळवारपासून राज्यातील सुमारे १० हजार कनिष्ठ निवासी डॉक्टर कोलकता येथील वैद्यकीय महाविद्यालय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ संपावर गेले आहेत. याबाबत राज्यातील निवासी डॉक्टरच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.15) मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. मात्र त्यांच्याशी झालेला चर्चेतून निवासी डॉक्टरांचे समाधान झालेले नाही.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण मिळेल आणि हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्याचेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच मुंबई पालिका रुग्णालयातील वसतिगृह सुविधांबाबत महानगरपालिका आयुक्तांशी यांच्याशी संपर्क साधून पालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहाच्या समस्या सोडविण्याच्या आणि सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याच्या सूचनाही दिला. पण तरीही निवासी डॉक्टर संपावर ठाम आहेत.
दरम्यान, मार्डच्या या आंदोलनात शुक्रवारपासून वरिष्ठ निवासी आणि बांधपत्रित डॉक्टर सहभागी होणार आहेत. मार्डने आंदोलन सुरू केल्यापासून ओपीडी आणि शस्त्रक्रियेवर मोठा परिणाम झाला. मात्र आता वरिष्ठ निवासी आणि बांधपत्रित ६००० डॉक्टरांच्या सहभागामुळे पूर्णच रुग्णसेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.