नाशिक : परवाना नूतनीकरण विलंब शुल्काच्या नावाखाली प्रतिदिन आकारण्यात येणाऱ्या ५० रुपये दंडाविरोधात तसेच अन्य मागण्यांसाठी शहरातील रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालकांनी पुकारलेला शुक्रवारचा (दि.१२) संप मागण्या मान्य झाल्याने गुरुवारीच (दि.११) मागे घेण्यात आला. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी तसेच टेम्पो चालक शुक्रवारी (दि.१२) ऑन ड्युटी राहणार असल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून या मागण्या मंजूर
रिक्षा मीटर कॅलीब्रेशनचा २ हजार रुपये दंड रद्द
टेम्पो स्टॅण्डला पुढील बैठकीत अधिकृत मंजूरी
आरटीओच्या कमिटीत युनियनच्या दोन प्रतिनिधींना स्थान
५० रुपये दंडाच्या विरोधासह शहरात बाइक टॅक्सीची मंजूरी रद्द करावी, शहरात टेम्पो व रिक्षा स्टँड मंजूर करण्यात यावे, रिक्षा चालकांना पेन्शन लागू करावी, त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे, रिक्षा मीटर कॅलीब्रेशनचा दोन हजार रुपये दंड रद्द करावा आदी मागण्यासाठी श्रमिक रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक चालक, मालक सेनेच्या वतीने शुक्रवारी संप पुकारला होता. या संपात शहरातील सर्व रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक सहभागी होणार असल्याने नाशिकची खासगी वाहतूक सेवा पूर्णत: कोलमडणार होती. खासगी स्कुल बस चालकांनी तर शाळांना संपाची कल्पना देत, शुक्रवारी (दि.१२) विद्यार्थ्यांची वाहतूक करणार नसल्याचे स्पष्ट केले हाेते. त्यानुसार शहरातील सर्वच शाळांनी व्हॉट्स ॲप ग्रुपवर पालकांना याबाबतची माहिती दिली होती. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टी देताना, ज्यांना शाळेत येणे शक्य होईल, त्यांनीच यावे अन्यथा येवू नये अशा प्रकारचे संदेश विद्यार्थ्यांना दिले होते. याव्यतिरिक्त शहरातील रिक्षा आणि टेम्पो सेवा बंद राहणार असल्याने, त्याचाही मोठा परिणाम वाहतुकीवर होणार होता.
मात्र, तत्पूर्वीच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधीमंडळात निवेदन करीत, राज्यभरातील आलेल्या संघटनांच्या निवेदनाचा विचार करून परवाना नुतनीकरण प्रतिदिन ५० रुपये विलंब शुल्कचा निर्णय पुढील आदेश येईपर्यंत मागे घेण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने, महासंघाच्यावतीने संप मागे घेण्याची घोषणा केली. दरम्यान, श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल, जिल्हा कार्याद्यक्ष भगवंत पाठक, जिल्हाध्यक्ष अजय बागुल, महानगर प्रमुख मामा राजवाडे, उपजिल्हा प्रमुख शंकर बागुल, जिल्हा चिटणीस सैय्यद नवाज, भद्रकाली रिक्षा युनियनचे हैदरभाई सैय्यद आदींनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेत अन्य मांगण्यावर चर्चा केली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी तीन मागण्या मान्य केल्या. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी शालिमार चौक येथे विजयी जल्लोष केला.
५० रुपये विलंब शुल्क मागे घेण्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनी पाच पैकी तीन मागण्या मान्य केल्याने नागरिक आणि प्रशासनाला का वेठीस धरायचे? या विचारातून आम्ही संप मागे घेतला आहे. शुक्रवारी नियमितपणे खासगी वाहतूक सेवा सुरू राहिल.
भगवंत पाठक, जिल्हा कार्याध्यक्ष, श्रमिक सेना, नाशिक.
दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी कृषीमंत्र्यांनी मागणी मान्य केल्याची घोषणा केल्यानंतर महासंघाच्यावतीने तत्काळ शहरातील सर्वच शाळांमध्ये संप मागे घेतल्याचे निरोप देण्यात आले. तत्पूर्वी बहुतांश शाळांना पालकांना शुक्रवारी स्कुल व्हॅन येणार नसल्याचे सांगितले होते. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता.
मोटर मालक, कामगार वाहतूक संघटनेच्या परवाना नूतनीकरण विलंब शुल्क रद्दच्या मागणीचा शासनाने विचार केला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे वाहतुकदारांकडून जाहीर आभार.
सचिन जाधव, अध्यक्ष, मोटार मालक, कामगार वाहतूक संघटना, नाशिक.