Gas Cylinder Shortage Sangli
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या नावाखाली उघडपणे काळाबाजार सुरू आहे. इंडेन गॅस एजन्सी आणि महसूल प्रशासनाच्या पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रकार बिनधास्त चालू आहे. सिलेंडर थेट अडीच हजार ते साडेतीन हजार रुपयांना विकला जात असल्याने सामान्य नागरिक अक्षरशः लुटला जात आहे. शिधापत्रिका मिळवण्यासाठीही सामान्य नागरिकांकडे उघडपणे पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारींचा भडीमार बैठकीत झाला.
पुरवठा विभागाच्या पाठिंब्याने शिधापत्रिकेवरील धान्य काळ्या बाजारात विकले जाते. असे गंभीर आरोप तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात झालेल्या या बैठकीत करत शहरातील इन्डेन गॅस एजन्सी आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे अक्षरशः वाभाडे काढत प्रशासनाचा निषेध केला.
तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडर वितरणात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस येत आहेत. सामान्य नागरिकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तीन हजार रुपये दिल्यास बुकिंग आहे की नाही याची खात्री न करता तात्काळ सिलेंडर दिला जातो, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. रांगेत उभ्या असलेल्या लोकांना तासन्तास थांबूनही सिलेंडर मिळत नाही, मात्र ऐनवेळी येणारे लोक वशिला लावून सहज सिलेंडर घेऊन जात असल्याच्या तक्रारी दररोज वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिक आमदारांना थेट फोन करून आपली व्यथा मांडत आहेत.
या पार्श्वभूमीवर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत महसूलचे पुरवठा विभाग प्रशासन आणि इन्डेन गॅस एजन्सीच्या व्यवस्थापक यांना चांगलेच फैलावर घेतले. दोन महिन्यांपासून महिला हेलपाटे मारत असूनही सिलेंडर मिळत नसल्याबद्दल आमदार रोहित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काम होत नसेल तर अधिकाऱ्यांनी पद सोडावे, आम्ही नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करून घेऊ, असा स्पष्ट इशारा देत त्यांनी पुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तालुक्यात दोन गॅस एजन्सी असतानाही कवठेमहांकाळ शहरातील इंडेन एजन्सीबाबत सर्वाधिक तक्रारी का येतात, असा सवाल उपस्थित करत आमदार पाटील यांनी प्रशासनाला जाब विचारला. लोकांची परीक्षा पाहू नका, अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार करावी लागेल, असा सज्जड दम त्यांनी दिला. गॅस वितरणात शाळा व अंगणवाड्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश देतानाच महसूल विभाग आणि गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक गावात संयुक्त भेटी देऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिधापत्रिकेवरील धान्य वाटपातही मोठे गैरप्रकार होत असल्याचे या बैठकीत समोर आले. नवीन शिधापत्रिका काढताना सामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असून, पैसे दिल्यासच कामे तत्काळ होत असल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला. ही बाब यापुढे अजिबात सहन केली जाणार नाही, असा इशारा देत आमदार रोहित पाटील यांनी प्रशासनाला जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले. तालुक्यातील गॅस वितरण व शिधा व्यवस्थेतील या गंभीर प्रश्नांवर तातडीने उपाययोजना न केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती दादासाहेब कोळेकर, पंचायत समितीच्या सभापती सिंधूताई पाटील, उपसभापती वामन कदम, जिल्हा परिषद सदस्य संजय बनसोडे, विकास हाक्के, पंचायत समिती सदस्य रविकिरण घागरे, वैशाली माने, हायूम सावनूरकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील, महेश पवार, संदीप पाटील, अर्जुन गेंड यांच्यासह पदाधिकारी आणि विविध गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.