सांगली ः सांगली जिल्ह्यातील शासकीय अन्नधान्य गोदामांमध्ये काम करणाऱ्या 140 हमालांचे गेल्या तीन महिन्यांपासूनचे वेतन थकीत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीतील मजुरी अद्याप न मिळाल्याने हमालांनी 10 एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखालील 11 मुख्य आणि 2 उपगोदामांमध्ये हे हमाल कार्यरत आहेत. हे सर्व कामगार सांगली माथाडी मंडळाचे नोंदणीकृत सदस्य असून सांगली जिल्हा हमाल पंचायतशी संलग्न आहेत. जिल्ह्याच्या अन्नधान्य पुरवठा यंत्रणेतील हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मात्र, हक्काची मजुरी वेळेवर मिळत नसल्याने या कामगारांच्या कुटुंबांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. माथाडी कायद्यानुसार, दर महिन्याच्या 5 तारखेपूर्वी कामगारांची मजुरी जमा करणे बंधनकारक आहे. असे असतानाही गेल्या दोन वर्षांपासून या नियमाचे सर्रास उल्लंघन होत असून कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसल्याचा आरोप केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.
विविध मागण्यांसाठी एल्गार
प्रलंबित मजुरी तातडीने मिळावी, मागील वर्षांतील दरवाढीचा फरक (एरिअर्स) मिळावा, विविध सरकारी योजनांतील हमालीची देयके अदा करावीत आणि गोदामांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा पुरवाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काम सुरू करणार नाही, असा पवित्रा हमालांनी घेतला आहे, अशी माहिती कामगार नेते विकास मगदूम यांनी दिली.