

सांगली : महानगरपालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांचा प्रश्न कायम असतानाच, आता विदेशी जातीच्या आक्रमक पाळीव कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा नवा प्रश्न पुढे आला आहे. सोमवारी त्रिकोणी बागेजवळ पिटबुल जातीच्या आक्रमक विदेशी कुत्र्याने एका सातवर्षीय बालकावर हल्ला केला. त्याच्या चेहऱ्याला चावा घेत गंभीर जखमी केले. या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित मालकावर कडक कारवाईची मागणी होत आहे.
विदेशी जातीच्या आक्रमक पाळीव कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी फिरवण्याबाबत कठोर नियम गरजेचे आहेत. त्याबाबत महापालिकेला केव्हा जाग येणार? की आणखी एखाद्या अशा हल्ल्याची घटना घडावी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पिटबुलसह रॉटव्हीलर, डॉबरमन, जर्मन शेपर्ड, अमेरिकन बुली, केन कोर्सो, बेल्जियम शेपर्ड, टेरिअर ग्रुप यांसारख्या ताकदवान आणि आक्रमक जातींची कुत्री शहरात मोठ्या प्रमाणावर पाळली जात आहेत. या कुत्र्यांना त्यांचे मालक अथवा घरगडी त्यांना सकाळी, सायंकाळी सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर फिरवायला आणतात. मात्र अशावेळी त्यांच्याकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसते. अशा कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी आणताना मजबूत पट्टा, तोंडाला मास्क लावलेला असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. विदेशी जातीच्या ताकदवान आक्रमक पाळीव कुत्र्याने हल्ला केला, तर तो जिवावर बेतण्याची भीती अधिक असते. सोमवारी येथील त्रिकोणी बागेजवळ पाळीव पिटबुल कुत्र्याने एका बालकावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या कुत्र्याच्या मालकावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
कुत्र्यांकडे पाहिले तरी भीती वाटते
पिटबुल, रॉटव्हीलर, डॉबरमन, जर्मन शेपर्ड, अमेरिकन बुली, केन कोर्सो, बेल्जियम शेपर्ड, टेरिअर ग्रुप यांसारखी विदेशी जातीची आक्रमक पाळीव कुत्री शहरात दिसून येतात. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर ही कुत्री फिरवायला आणली जातात. या कुत्र्यांकडे पाहिले, की त्यांच्या नजरेतील आक्रमकपणा दिसून येतो. ही कुत्री ताकदवान, वजनदार आणि आक्रमक दिसतात, पण त्यांना फिरायला घेऊन येणाऱ्या व्यक्ती बऱ्याचदा बेताच्या प्रकृतीच्या असतात. अशा व्यक्ती या ताकदवान, आक्रमक कुत्र्यांना नियंत्रणात कसे आणणार, असा प्रश्न निर्माण होतो.