Karanje Hanuman Seva Society License Cancelled
विटा: धान्याची परस्पर विक्री केल्याप्रकरणी करंजे (ता. खानापूर) येथील हनुमान सेवा सोसायटीचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुल्के यांनी हा निर्णय आज (दि.३०) दिला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, करंजे (ता.खानापूर) येथील हनुमान सर्व सेवा सोसा यटीकडे गावातील रास्त भाव (रेशनिंग) दुकान आहे. मागील काही दिवसांपासून या दुकानातून गहू आणि तांदळाची परस्पर विक्री केली जात होती. त्या मुळे मूळ लाभार्थीना धान्य कमी पडत होते, याबाबतच्या तक्रारी तहसीलदार कार्यालयाकडे आल्या होत्या.
दरम्यान, गावातील प्रवीण माने आणि इतर लोकांनी तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडून आलेल्या १ क्विंटल १४ किलो गहू आणि ६७ किलो तांदळात तफावत आढळून येत आहे, अशी तक्रार विट्याच्या तहसीलदारांकडे केली होती. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडेही गेले होते. त्यावर आज (दि.३०) निकाल दिला. या निकाल पत्रात म्हटले आहे की, करंजेच्या हनुमान सेवा सोसायटीच्या अध्यक्षांकडे असलेले गावातील रास्त भाव दुकान परवान्याची संपूर्ण अनामत रक्कम जप्त करून रास्त भाव दुकान परवाना कायम स्वरूपी रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय दिला.
विट्याच्या तहसिलदारांच्या आदेशातील धान्य तफावतीमधील जादाचा ७८ किलो गहू आणि ५ किलो तांदूळ हा पुढच्या वेळी धान्य देताना कमी करुन पाठवावेत. तसेच कमी असलेला १ क्विंटल १४ किलो गहू आणि ६७ किलो तांदूळ इतकी तफावतची रक्कम सेवा सोसायटीचे अध्यक्षांकडून तत्कालीन बाजारभावाप्रमाणे वसूल करून घेऊन ती चलनाने शासनाकडे जमा करावी आणि संबंधित रास्त भाव दुकानाचा परवाना कायम स्वरूपी रद्द झाल्यामुळे तहसीलदारांनी सोसायटीकडून काढून ते लगतच्या दुकानास जोडावे, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.