

हरिपूर : सांगली-हरिपूर रस्त्याच्या कामकाजावर स्वतंत्र पुस्तक तयार होईल, असा अजब कारभार सुरू आहे. जेथे काँक्रिटचा रस्ता पूर्ण झाला आहे, तेथे पाऊस मुक्कामाला आला. खरे तर या रस्त्यावर पाणी वाहून जाण्याची व्यवस्थाच केली नाही, परिणामी पावसाच्या पाण्याने काँक्रिटच्या रस्त्यावर मुक्काम ठोकला. असे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा पंपाद्वारे उपसा करून ते टँकरमध्ये भरून नेण्यात आले.
या रस्त्याच्या बाजूला कोणत्याही प्रकारची गटार केलेली नाही. पाण्याचा निचरा होण्याचे जे नैसर्गिक स्रोत होते, त्याचे काय झाले? हा कळीचा प्रश्न. पहिल्या पावसातच या रस्त्यावर पाण्याचे तळे ठिकठिकाणी साचले आहे. प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणार आणि ते टँकर घेऊन जाणार का? अशी ग्रामस्थांची विचारणा आहे.
रस्त्याच्या बांधणीसाठी मूळ रस्त्याची खोदाई करण्यात आली. ती करताना दोन्ही बाजूंच्या चिंचेच्या महाकाय झाडांच्या मुळांवर घाव बसले आहेत. परिणामी काही झाडे कमकुवत झाली असण्याची मोठी शक्यता आहे. सुमारे तीन-चार झाडे कोसळू शकतात. मंगळवारी रात्री एक महाकाय झाड कोसळले. त्या खाली कोणी सापडले नाही, हे चांगले. त्यावेळी कोणीही पादचारी किंवा वाहनचालक जात नसल्याने मोठा अनर्थ टळला.