

Soil used in Vita Lengre Roadwork BJP Workers Protest
विटा : विटा ते लेंगरे रस्त्याच्या कामात चक्क मातीचा वापर केल्याचा प्रकार समोर आल्याने तालुका भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे काम बंद पाडले. राज्य सरकारच्या हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल (हॅम) अंतर्गत विटा ते लेंगरे हे काम सुरू आहे. जुना साडेतीन ते पाच फुटापर्यंत संपूर्ण रस्ता खोल खोदून हॅम अंतर्गत हा रस्ता नव्याने होणार आहे. मात्र, ठेकेदार कंपनीकडून या रस्त्यात चक्क मातीचा वापर केला जात आहे, असा आक्षेप तालुका भाजपने घेतला.
याबाबत आज (दि.२८) टिकाव आणि फावडे घेऊन भाजपचे तालुका अध्यक्ष पंकज दबडे, अनुसूचित जाती आघाडीचे संदीप ठोंबरे, अध्यात्मिक आघाडीचे संतोष यादव, सुहास कुलकर्णी यांच्यासह लेंगरे रस्त्यावर आले. तिथे रस्त्याचे काम सुरू असणाऱ्या कामगारांना त्यांनी थांबवले आणि भर रस्त्यात खाली उतरून संतोष यादव यांनी हातात टिकाव घेऊन चक्क रस्ता खोदण्यास सुरुवात केली. यावेळी मातीचा चिखल वर आला.
तालुकाध्यक्ष पंकज डबडे म्हणाले, विटा, लेंगरे, भूड, खरसुंडी, तडवळे, माडगुळे या रस्त्याचे काम राज्य सरकारच्या हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल (हॅम) अंतर्गत सुरू आहे. रस्त्यासाठी एकूण २३७ कोटी निधी खर्च होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी या रस्त्याचे उद्घाटन झाले. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे, या रस्त्यात आणि रस्त्याच्या कडेच्या साईड पट्ट्यांमध्ये मुरमा ऐवजी चक्क माती घातली जात आहे. आणि वरून रोलर फिरवला जात आहे, अशा तक्रारी जोंधळ खिंडी, लेंगरे, मादळमुठी, सांगोले, देवनगर इत्यादी गावांतील लोकांनी आमच्याकडे केल्या आहेत.
त्यामुळे आम्ही रस्त्याची पाहणी केली असता मातीचा वापर केल्याचे निदर्शनास आले. त्यावर आम्ही संबंधितांना दोन दिवस काम बंद ठेवा. दोन दिवसानंतर आमचे लोकप्रतिनिधी आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर हे इथे येऊन पाहणी करतील. तुमच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना इथे बोलवा. चर्चा करू, त्यानंतरच काम सुरू ठेवायचे किंवा नाही, याबद्दल निर्णय घेऊ, असे त्यांना सांगितले.
यावेळी प्रथमेश साळुंखे, आकाश भस्मे, अक्षय मोहिते, सोमनाथ जाधव, संजय काळे, सामराय तुबंगी, महेश कणसे, रोहित मोहिते, गणेश जाधव, आयुष लकडे, प्रदीप जाधव, आबासो जाधव आदी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.