जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील बाबरवस्ती (पांडोझरी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा झाला. दैनिक पुढारी तर्फे जागर स्वावलंबी शिक्षणाचा उपक्रम संपूर्ण शाळेत प्रभावीपणे राबविण्यात आला. यावेळी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्वावलंबी शिक्षणाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन दैनिक पुढारी अंकाचे वाटप केले. गावातील वाड्यावस्त्यांवर, दुर्गम भागात दैनिकाचे वाटप करून विद्यार्थ्यांनी अंकाचे वाचन केले.
तसेच शाळेतील ग्रंथालयात असणाऱ्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवून मुक्त वाचनालय खुले करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. वृत्तपत्र विक्रेते हे ऊन, वारा, व पाऊस यांची तमा न बाळगता घरोघरी जाऊन वृत्तपत्रांची विक्री करतात. याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेते अनिल सायगाव यांचा गुलाबपुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी विनोद माने यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लेखन साहित्य वाटप केले.