सांगली

सांगली : प्लॉट, चारचाकीत गुंतवणुकीचे फंडे, हे हवाला रॅकेट तर नाही ना…?

Shambhuraj Pachindre

सांगलीत दोन-तीन वर्षांत दामदुप्पट लाभ देणार्‍या शेअर्स, डॉलर्सच्या बोगस कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांचा कल्पकतेने वापर करीत आहेत. प्लॉट, अलिशान चारचाकीत गुंतवणूक करण्याचे फंडे वापरले जात आहेत. ही मिळालेली रक्कम मनी रोलिंग केली जात असल्याने बडे कंत्राटदार, बिल्डर आणि काही नेत्यांचे नातेवाईक यात सहभागी असावेत अशी शंका व्यक्त होत आहे. तसेच यात हवाला रॅकेट आहे का, याच्याही चौकशीची मागणी होत आहे.

एक लाखापासून ते पाच किंवा दहा लाख गुंतवणूक या योजनेत अनेकजण सहभागी होत आहेत. काही जणांना मोठी रक्कम गुंतवायची असते. पण त्यांना सुरक्षितता हवी असते. त्यामुळे या कंपन्यांनी नवनवीन फंडे वापरण्यास सुरुवात केली आहे. काही कंपन्या जमीन विकसित करणार्‍यासाठी घेतात.

यातील प्लॉटमध्ये 25 ते 30 लाख गुंतवणूक करण्याची इच्छा असणार्‍यास बँकेतून कर्ज काढण्यास सांगितले जाते. ही रक्कम पूर्णपणे त्या कंपनीकडे सुपूर्त करावी लागते. या बदल्यात केवळ नोटरी करून प्लॉट ग्राहकाच्या नावावर केल्याचा देखावा केला जातो. कर्जाचे हप्ते कंपनी फेडेल अशी हमी ग्राहकांना दिली जाते. काही हप्ते कंपनी फेडते. परंतु वर्षभरात कंपनी गाशा गुंडाळते. त्यामुळे कर्जही फेडावे लागते अणि प्लॉटही मिळत नाही.

असा फंडा आलिशान कारबाबतही वापरला जातो. चारचाकीसाठी कर्ज काढण्यास सांगून यातील ठराविक रक्कम डाऊन पेमेंटला भरावी लागते. उर्वरित रक्कम कंपनीला द्यावी लागते. या बदल्यात कंपनी कारच्या कर्जाचे हप्ते भरते. परंतु हेही फार काळ चालत नाही. मात्र कारच्या जोरावर इतर ग्राहकांना भुलविण्याचा उद्योग केला जातो. याला अनेक ग्राहक फसतात. एक-दोन वषार्ंत कंपनी पलायन करते आणि कर्जाचा भुर्दंड मात्र गुंतवणूकदाराला सोसावा लागतो.यातून मिळालेली मोठी रक्कम कंपनीवाले मनी रोलिंगमध्ये बिल्डर, कंत्राटदार यांना देतात. ते पुढे गुंतवणूक करतात असे सांगितले जाते. बंद पडलेली

परराज्यातील बँक विकत घेतली

एका बोगस कंपनीच्या म्होरक्याने परराज्यातील बंद पडलेली आर्थिक संस्था विकत घेतली आहे. या संस्थांच्या शाखांचे जाळे तीन राज्यात पसरविले आहे. शेती औषधांचा उद्योग करणारी ही व्यक्ती एका नेत्याचा पाठिंबा असल्याचे सांगते आहे. प्रत्यक्षात या नेत्याचा त्याला कोणताही पाठिंबा नाही.

गुंतवणूकदारांची कंपन्यांच्या कार्यालयासमोर गर्दी

गेल्या दोन दिवसांपासून शेअर्स, फॉरेक्स मार्केटमधील चुकीच्या गुंतवणुकीचा घोटाळा उघडकीस आल्याने कंपनीचे चालक, एजंट, ग्राहक हादरले आहेत. पैसे बुडतील या भितीने अनेक गुंतवणूकदार या कंपन्यांच्या कार्यालयात गदीर्र् करीत आहेत. कंपनी प्रतिनिधी व एजंट यांना फोन वरून 'आमचे पैसे परत द्या' अशी मागणी केली जात आहे. यामुळे कंपनीचे संचालक हैराण झाले आहेत.

बँकांच्या ठेवी घटल्या : संचालक मंडळ चिंताग्रस्त

या फसव्या योजनेच्या मायाजालात गुंतून अनेकजण बँकांतील ठेवी मोडत आहेत. सोने गहाण, कर्ज करून या बोगस योजनांत गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे बँकांतील ठेवी भराभर कमी होऊ लागल्या आहे. ठेवी कमी होऊ लागल्याने बँकांचे पदाधिकारी, संचालक मंडळ काळजीत पडले आहे.

परवाने असल्याची माहिती चुकीची

मार्केटमध्ये असलेल्या अनेक गुंतवणूकदार कंपन्यांनी संबंधित सरकारी अधिकृत यंत्रणेची परवानगी घेतलेली नाही. काहींनी याबाबतची बनावट कागदपत्रे तयार केली असल्याची तक्रार आहे. ती गुंतवणूकदारांना दाखवून फसवणूक केली जात आहे. तसेच होत असलेल्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता नाही. कोणत्याही व्यवहारात जीएसटी भरलेला दाखविला जात नाही. परदेशी चलनाचा व्यवहार करताना मोठा कर भरावा लागतो. याबाबतची कागदपत्रेही ग्राहकांना चुकीची दाखविली जातात. काही कंपन्यांचे तर केवळ मोबाईलवर व्यवहार चालत आहे.

पाहा व्हिडिओ : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अंत्यर्दशनासाठी गर्दी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT