छडीची जागा घेतली सकारात्मक शिस्तीने 
सांगली

Sangli News : छडीची जागा घेतली सकारात्मक शिस्तीने

बदलत्या संकल्पनेने मुलांमध्ये बदल घडणार का?

पुढारी वृत्तसेवा

चिंचणी : ‌‘छडी लागे छम-छम, विद्या येई घम-घम‌’ हे विद्यार्थ्यांमधील शिस्तीचे सूत्र होते. परंतु सध्या शिक्षणतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ व पालक यांना छडीऐवजी सकारात्मक शिस्त ही प्रभावी आहे असे वाटत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भीतीवर आधारित शिस्त नव्हे तर समज, संवाद आणि आत्मशिस्त निर्माण करणारी सकारात्मक शिस्त आवश्यक असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

सकारात्मक शिस्त म्हणजे विद्यार्थ्यांनी चूक केल्यावर त्यांना शिक्षा देणे नव्हे, तर त्यांच्या वर्तनाचे परिणाम समजावून देत योग्य मार्गदर्शन करणे होय. या पद्धतीत विद्यार्थ्यांशी योग्य संवाद साधला जातो. तसेच त्यांच्या भावना समजून घेतल्या जातात आणि समस्यांवर उपाय शोधण्यास त्यांना प्रवृत्त केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारीची भावना तसेच निर्णयक्षमता आणि आत्मज्ञान विकसित होते. विविध संशोधनानुसार छडी मारल्यामुळे किंवा दिलेल्या शिक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती, मानसिक तणाव व न्यूनगंड तयार होतो आणि त्याचा थेट परिणाम त्याच्या शैक्षणिक प्रगतीवर तसेच व्यक्तिमत्त्व विकासावर होतो. काहीवेळा अशा शिक्षेमुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावण्याची शक्यता असते.

याउलट सकारात्मक शिस्त विद्यार्थ्यांना चुका सुधारण्याची संधी देते आणि शिक्षक-विद्यार्थी नात्यांमध्ये एक प्रकारचा नवीन विश्वास निर्माण करते. आज अनेक शाळांमध्ये प्रेरणादायी संवाद, समुपदेशन, गटचर्चा, कौतुक, प्रोत्साहन या माध्यमांतून शिस्तीचे नियम प्रभावीपणे राबवले जात आहेत. वर्गातील नियम ठरवताना विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाते. त्यामुळे विद्यार्थी ते नियम स्वतःचे मानून त्यांचे पालन करण्याची जबाबदारी स्वतः स्वीकारतात, हा एक महत्त्वाचा बदल विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे. शिक्षकांनी आदर्श वर्तनातून शिस्तीचे धडे दिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांवर दिसून येतो. या प्रक्रियेत पालकांची भूमिकादेखील अत्यंत महत्त्वाची आहे.

शिस्तीतून संवेदनशीलतेस मदत...

घर आणि शाळा यांच्यात योग्य समन्वय असल्यास सकारात्मक शिस्त अधिक परिणामकारक ठरते. पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून आणि योग्यवेळी समजूतदार मार्गदर्शन केल्यास मुलांमध्ये शिस्त आपोआप रुजते. एकूणच छडीला पर्याय म्हणून सकारात्मक शिस्त आजच्या काळाची गरज बनली आहे. ही शिस्त जबाबदारी, संवेदनशीलता आणि आत्मविश्वास वाढविण्यास मदत करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT